बसचा चेसिस क्रमांक खोडून अरुणाचलचा नोंदणी क्रमांक देणाऱ्या आरटीओ एजंट सह साथीदारावर गुन्हा दाखल
By धीरज परब | Published: December 9, 2023 01:09 AM2023-12-09T01:09:36+5:302023-12-09T01:09:48+5:30
बसचा व्यवहार पूर्ण झाल्याने शाकीर ह्याने महाराष्ट्राचा क्रमांक असलेली आयशर मिनी बस खान ह्याच्या ताब्यात दिली.
मीरारोड ( ठाणे ) - जुनी बस स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून बसचा चेसिस क्रमांक खोडून अरुणाचल प्रदेशच्या परिवहनचा नोंदणी क्रमांक देणाऱ्या आरटीओ एजंट सह ट्रॅव्हल एजंटवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपाराच्या उमराळे भागात राहणार फिर्यादी वाहन चालक एजाज अल्ताफ खान ( ३२ ) यांना मीरारोडच्या शिवार उद्यान येथील सहारा इंडिया टूर्स ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात शाकीर हुसेन याने जुनी बस खरेदी साठी ६ लाख २५ हजार व कागदपत्र बनवण्यासाठी अडीच लाख खर्च सांगितला. स्वस्तात बस मिळते म्हणून खान याने बसची सर्व रक्कम शाकीर ह्यास दिली. तसेच बस च्या कागदपत्रांसाठी शाकीर याच्या सांगण्या वरून आरटीओ एजंट रमेश सरोदे ह्याला २ लाख मित्राच्या गुगल पे खात्यावरून पाठवले.
बसचा व्यवहार पूर्ण झाल्याने शाकीर ह्याने महाराष्ट्राचा क्रमांक असलेली आयशर मिनी बस खान ह्याच्या ताब्यात दिली. एजंट सरोदे ह्याने गणेश नावाच्या इसमास पाठवून बसच्या चेसिस क्रमांकावर खाडाखोड करत खान यांना महाराष्ट्राच्या परिवहन विभागाचा नोंदणी क्रमांक न देता थेट अरुणाचल प्रदेशच्या परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक दिला.
बाहेरच्या राज्यातील वाहनांची महाराष्ट्रात तपासणी होत असल्याने खान ह्याने घाबरून अरुणाचल प्रदेशचा क्रमांक न लावता महाराष्ट्राचा बनावट क्रमांक बस ला लावला. दरम्यान चोरीच्या वाहनांना अन्य राज्यातील स्क्रॅप वाहनांचे क्रमांक वापरून फसवणूक करणाऱ्या टोळीला उघडकीस आणल्या नंतर त्याचा अधिक तपास करणाऱ्या मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ च्या पोलिसांनी खान यांच्या बसची तपासणी करून ती जप्त केली.
शाकीर हुसेन व एजंट रमेश सरोदे यांनी ८ लाख २५ हजार घेऊन बसची कागदपत्रे बनवून न देता मूळ चेसीसी क्रमांक खोडून अरुणाचल प्रदेशच्या परिवहन चा क्रमांक लावण्यास सांगून फसवणूक केल्याने खान यांच्या फिर्यादी वरून मीरारोड पोलीस ठाण्यात ६ डिसेम्बर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास टोकले व पथक तपास करत आहे.