चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी पाच आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल; कारचालकला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:10 PM2022-12-11T19:10:55+5:302022-12-11T19:12:28+5:30
चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी पाच आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करून कारचालकाला अटक करण्यात आली आहे.
(मंगेश कराळे)
नालासोपारा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चालत्या कारमधून १० महिन्याच्या मुलीला फेकून तिचा मृत्यू झाल्याप्रकरणी मांडवी पोलिसांनी शनिवारी रात्री पाच आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कारचालकला पोलिसांनीअटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
पेल्हार येथे राहणाऱ्या सोनाक्षी वाकडे (२०) ह्या आपल्या १० महिन्याच्या लावण्या या चिमुकलीसह वाडा येथील मूळ गावी जाण्यासाठी इको कारमध्ये पेल्हार येथून बसल्या. त्या प्रवास करताना आरोपी कारचालक आणि पाठीमागे बसलेले तीन आरोपींनी त्यांच्या हाताला, मांडीला आणि शरीराला स्पर्श करून मनाला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. पाठीमागील तिन्ही आरोपींनी तिच्या हातातील मुलीला स्वतःकडे खेचून कारच्या बाहेर रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर सोनाक्षीने धावत्या कारमधून विरार फाटा येथे उडी मारली. या घटनेत चिमुकलीच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत व जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तर जखमी सोनाक्षी वाकडे यांच्यावर मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची संवेदनशीलता व गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा जलद गतीने व चोख तपास होण्यासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, झालेल्या घटनेप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी कार चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी दिली.