गायिका असल्याचे सांगून वेश्यावसाय चालवणाऱ्या महिला दलालास अटक
By धीरज परब | Published: February 28, 2024 08:06 PM2024-02-28T20:06:35+5:302024-02-28T20:08:08+5:30
पिटा कायद्या नुसार रोशनी हिच्यावर मंगळवारी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोड- वेश्या व्यवसायासाठी हिंदी कव्वाली मध्ये काम करणाऱ्या तरुणी पुरवणाऱ्या व स्वतःस गायिका म्हणवणाऱ्या महिला दलालास मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिकबंधक शाखेने सापळा रचून अटक केली आहे .
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना माहिती मिळाली की, रोशनी बबलू शेख ( ४० ) रा . सांताक्रूझ हि महिला स्वतःला गायिका सांगते व ती हिंदी कव्वाली मध्ये काम करणाऱ्या गायिका तरुणींना वेश्या व्यवसाय साठी पुरवते. सांताक्रुझ, अंधेरी, दहिसर, बोरीवली, काशिमीरा या परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गिन्हाईकाचे सोयीनुसार एका मुलीचा वेश्यागमनाचा मोबदला व तिचे कमीशन असे मिळून २० हजार रुपये घेते .
पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक मार्फत तिच्याशी संपर्क केला असता तिने सांगितल्याप्रमाणे दारास ढाबा, मुंबई - अहमदाबाद महामार्ग येथे येण्यास सांगितले . पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहायक उपनिरीक्षक उमेश पाटील सह शिवाजी पाटील, केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत, सम्राट गावडे, शितल जाधव, पुजा हंडे यांनी सोमवारी सायंकाळी दारास ढाबा येथे सापळा रचला. तिने बोगस गिऱ्हाईक कडून रक्कम स्वीकारत एक तरुणीस वेश्यागमनासाठी दिले. पोलिसांनी खात्री पटताच छापा टाकून तिला ताब्यात घेतले व पीडित तरुणीची सुटका केली. पिटा कायद्या नुसार रोशनी हिच्यावर मंगळवारी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.