किल्ल्यात रील्ससाठी आग, तरुणावर गुन्हा; पुरातत्त्व विभागाच्या तक्रारीवरून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:59 AM2023-05-24T08:59:43+5:302023-05-24T08:59:49+5:30
वसई किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्चमध्ये हासीम शेख या तरुणाने इन्स्टाग्राम रिल्ससाठी तेथील शिलालेखावर ‘एस’ आकारात ज्वलनशील रसायन टाकून आग लावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा/पारोळ : वसई भुईकोट किल्ल्यातील येणाऱ्या काही उत्साही पर्यटक तरुणांकडून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच शिलालेखावर आग लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप किल्ला संवर्धनप्रेमींनी केला. याबाबत पुरातत्त्व विभागाकडून आरोपी तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्चमध्ये हासीम शेख या तरुणाने इन्स्टाग्राम रिल्ससाठी तेथील शिलालेखावर ‘एस’ आकारात ज्वलनशील रसायन टाकून आग लावली होती. शेखने याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावरून व्हायरल केला होता. याची गंभीर दखल घेत, इतिहास अभ्यासक, तसेच किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्त्व विभागाकडे ईमेलद्वारे तत्काळ तक्रार केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी कैलास नामदेवराव शिंदे यांनी वसई पोलिसांत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, किल्ल्यात इतिहासकालीन शिलालेख, चर्च, तुरुंग, त्या काळातील पोर्तुगीजांचे कार्यालय तसेच अन्य ऐतिहासिक गोष्टी किल्ल्यात आजही पाहावयास मिळतात.
सुरक्षारक्षक पैसे घेऊन देत होता परवानगी
वसई किल्ल्यात घडलेल्या एका रिल्स प्रकरणात गडप्रेमी तसेच इतिहास अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच किल्ल्यात होणाऱ्या प्री-वेडिंंग शूटिंग व रिल्स बनवण्यासाठी किल्ल्यातील सुरक्षारक्षकच पैसे घेऊन संबंधिताना संमती देत असल्याचा आरोप स्थानिक व गडप्रेमी नागरिकांनी केला आहे. याबाबत केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे वसईसारख्या ऐतिहासिक किल्ल्याची होत असलेली नासधूस इतिहास अभ्यासक आणि गडप्रेमी नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरल्याचीच सध्या चर्चा आहे.