एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:32 PM2022-11-04T18:32:08+5:302022-11-04T18:32:44+5:30
एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
(मंगेश कराळे)
नालासोपारा : एटीएम कार्डची अदलाबदली करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केले आहे. या आरोपींकडून ६ गुन्ह्यांची उकल करून वेगवेगळ्या बँकेचे २१ एटीएम कार्ड, एक दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याचे कोण कोण साथीदार आहेत का, याने कुठे अजून गुन्हे केले का याचा पोलीस अधिक तपास करत आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबतीत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल आणि आरोपींना पायबंद घालण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहिती मिळाल्यावर आरोपी मोहम्मद आरिफअली शेख (४८) याला हनुमान नगर परिसरातून मंगळवारी अटक केले आहे. तुळींज, आचोळे, विरार, काशीमिरा, एमआयडीसी आणि आंबोली या पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल केली. आरोपीकडून २१ वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीची सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी असून त्याचा ताबा तुळींज पोलिसांना दिला आहे