मित्रानेच केला मित्राचा विश्वासघात! गाडी घेण्यासाठी पैसे घेतले अन् परस्पर विकली
By धीरज परब | Published: December 2, 2023 07:19 PM2023-12-02T19:19:01+5:302023-12-02T19:19:23+5:30
मित्राला गाडी घेण्यासाठी स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन देणाऱ्या मित्राची फसवणूक केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे.
मीरारोड : मित्राला गाडी घेण्यासाठी स्वतःच्या नावाने कर्ज घेऊन देणाऱ्या मित्राची फसवणूक केल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. छत्रपाल राजपूत हे भाईंदरच्या एसएन कॉलेज जवळ राहतात. भाईंदर पश्चिमेस शिवसेना गल्लीत राहणारा त्यांचा मित्र विश्वराम छोटेलाल गुप्ता ह्याला कर्ज घेऊन कार खरेदी करायची होती. मात्र त्याचा आर्थिक अहवाल चांगला नसल्याने त्याने राजपूत यांना त्यांच्या नावावर कर्ज घेण्यास व त्याचे हप्ते दरमहा आपण न चुकता भरू असे आश्वस्त केले होते. राजपूत यांनी देखील मैत्री असल्याने विश्वास ठेऊन बँकेतून स्वतःच्या नावे २०१६ साली ४ लाख २५ हजारांचे वाहन कर्ज काढून दिले.
परंतु त्या नंतर मात्र गुप्ता ह्याने कर्जाचे हप्ते भरले नाही व राजपूत यांना धनादेश दिला तो सुद्धा खात्यात पैसे नसल्याने बाउंस झाला. इतकेच नव्हे तर गुप्ता याने ती गाडी परस्पर दुसऱ्यास विकून टाकली. मित्रानेच विश्वासघात करून फसवणूक केल्याने अखेर राजपूत यांनी १ डिसेंबर रोजी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुप्ता वर गुन्हा दाखल केला आहे.