डहाणूत पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा; स्मशानभूमीत पोहोचायलाही रस्ता नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:12 AM2024-08-06T10:12:30+5:302024-08-06T10:13:01+5:30
गेल्या आठवड्यात तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा येथे नाल्यावर पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांना चक्क अंत्ययात्रेदरम्यान मृतदेह पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली.
हितेन नाईक
पालघर : जिल्हा निर्मितीला दहा वर्षे उलटली तरी अद्याप रस्ते, वीज, पाणी या गरजेच्या सुविधांपासून पालघरवासीय वंचित आहेत, याचा प्रत्यय विविध घटनांतून येत असतो. अनेक गावपाड्यात जायला रस्ते नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात तर येथील नागरिकांचा संपर्क तुटतो, तर कधी जीव धोक्यात घालून या पाण्यातून त्यांना प्रवास करावा लागतो. गेल्या आठवड्यात तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा येथे नाल्यावर पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांना चक्क अंत्ययात्रेदरम्यान मृतदेह पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ आली.
पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून, एकूण ९०४ गावांत अनेक ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव आहे. अजूनही केळवे पाली पाडा येथील स्मशानभूमीत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागते, तर डहाणू येथील सोनाळे खूबरोड पाडा या ठिकाणीही शनिवारी नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह कमरेभर पाण्यातून न्यावा लागला होता.
निधी मिळूनही सुविधांपासून वंचित?
डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायतीमध्ये आठवडाभरापूर्वी विजय वझे यांच्या आईचा मृत्यू झाल्यावर स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करताना मोठा पाऊस आल्याने मृतदेह प्लास्टिकने झाकण्याची वेळ नातेवाइकांवर आली होती. केंद्र आणि राज्य शासन पेसाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना जिल्ह्यातील गावपाडे आणि तेथील आदिवासी समाज अजूनही सोयी-सुविधांपासून वंचित का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केळवे पालीपाडा येथील आदिवासी बांधवांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कमरेइतक्या पाण्यातून जाण्याची वेळ येत असेल तर याच्याइतके दुर्दैव ते काय? या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
- ॲड. प्रथमेश प्रभोतेंडोलकर, पालघर