बनावट धनादेश व कागदपत्रांच्या द्वारे फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला अटक
By धीरज परब | Published: November 14, 2023 07:38 PM2023-11-14T19:38:03+5:302023-11-14T19:38:33+5:30
बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मीरारोड - बनावट धनादेश द्वारे बँक व्यवस्थापक यांनाच ११ लाख ९२ हजार रुपयांना फसवणाऱ्या सराईत भामट्याला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ह्या आरोपीवर ठाणे, मुंबई, नागपूर सह मीरारोड, वसई - विरार भागात ९ गुन्हे दाखल आहेत. बनावट कागदपत्रां द्वारे आरोपी व त्याच्या साथीदारांनी मिळून पतपेढी, बँक, फायनान्स कंपनीना काही कोटींचा गंडा घातला आहे.
मीरारोडच्या डिसीबी बँकेच्या व्यवस्थापक जया विनोद बजाला यांच्या फिर्यादी वरून दाखल गुन्ह्यात दुबे याने ३ बनावट धनादेश बनवून ते वेगवेगळया बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले. नंतर दुसऱ्या बँकेत ती रक्कम वळती करून काढून घेत बँकेची ११ लाख ९२ हजार ५००रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोड पोलिस ठाण्यात मार्च २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाच्या तपासात आरोपीचे नाव सुशिल अंबीकाप्रसाद दुबे (४५) असल्याचे निष्पन्न झाले मात्र दुबे हा सतत वास्तव्य बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण कक्षचे पोलिस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार मार्फत दुबे याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल राख, निरीक्षक हितेंद्र विचारे सह श्रीमंत जेधे, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, प्रविणराज पवार, आसिफ मुल्ला यांच्या पथकाने मीरारोडच्या कनकिया येथील तिवारी कॉलेज भागात सापळा रचून दुबे ह्याला ११ नोव्हेंबर रोजी शिताफीने ताब्यात घेतले. दुबे हा भाईंदर पूर्व येथील चित्तोडगड इमारतीत राहणारा आहे.
अर्नाळा पोलिस ठाण्यात उज्जीवन स्मॉल फायनान्स ला बनावट कागदपत्रांनी गृहकर्ज घेऊन २८ लाखाना तर वालीव पोलिस ठाण्यात माणिकपूर अर्बन क्रेडिट सोसायटीची १ कोटीची साथीदारां सोबत मिळून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. तसेच नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत सुद्धा फसवल्याचे दाखल गुन्ह्यात दुबे हा पोलिसांना सापडत नव्हता. शिवाय त्याच्यावर २००४ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर भागात गुन्हे दाखल असून त्यात त्याला अटक झाली होती. नागपूर येथील गुन्ह्यात १५ दिवसां पूर्वीच तो सुटून आला होता.