लहान मुल चोरण्यासाठी आल्याचे समजून एकाला स्थानिकांनी केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 07:50 PM2022-09-26T19:50:22+5:302022-09-26T19:51:25+5:30
लहान मुले चोरण्यासाठी आल्या असल्याचे समजून एका व्यक्तीला स्थानिकांनी मारहाण केली.
मंगेश कराळे
नालासोपारा : लहान मुल चोरण्यासाठी आल्याचे समजून नालासोपाऱ्याच्या संतोष भवन परिसरात रविवारी संध्याकाळी एकाला स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी त्या व्यक्तीला गर्दीतून सुखरूप वाचवून व बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
वसईमध्ये मुलं चोरीच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडीयावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाले आहे, त्यामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेत बघत आहे. गौराईपाडा परिसरात एक व्यक्ती दारूच्या नशेत फिरत असताना रविवारी संध्याकाळी दिसला. तेव्हा स्थानिक लोकांना वाटले की तो मूल चोरण्यासाठी आला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळातच शेकडो लोक तिथे जमा झाले.
पेल्हार पोलिसांनी त्या व्यक्तीला गर्दीतून वाचवून खासगी रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून बालक चोरीच्या अफवा वेगाने पसरत आहेत. अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानंतरही मुले चोरीच्या अफवा लोकांमध्ये पसरत आहेत. विरार पश्चिममध्येही अशाप्रकारे बालक चोरीच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. तर वास्तव काही वेगळेच होते. मुले चोरीच्या घटना केवळ अफवा असून या अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका असे पोलिसांनी सांगितले आहे.