गर्भवतीचा लाकडावरून नदीतून प्रवास; मोखाड्यातील कुर्लोदमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:42 AM2023-07-26T07:42:47+5:302023-07-26T07:43:01+5:30
पावसाळ्यात चार गावपाड्यांचा तुटतो संपर्क
रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा (जि.पालघर) : समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या आदिवासीबहुल कुर्लोदपैकी शेड्याचापाडा येथील सुरेखा लहू भागडे (वय २२) या नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मंगळवारी पहाटे ताप-उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर, गावकऱ्यांनी तिला लाकडावर बसवून तुडुंब भरून वाहणाऱ्या देवबांध-पिंजाळ नदीचा प्रवाह पार करून दवाखान्यात पोहोचवले.
कुर्लोद ग्रामपंचायतीमधील शेड्याचापाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभूळपाडा या गावपाड्यांसाठी रस्ताच नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढल्यास या पाड्यांचा संपर्कच तुटतो. काही महिन्यांपूर्वी या नदीवर एका संस्थेकडून मोठा बंधारा बांधण्यात आला. यामुळे पाणी कमी असेल, तर यावरून जाणे-येणे शक्य होते.
पाच वर्षांत दगावले नऊ रुग्ण
कामानिमित्त किंवा आजारी पेशंट झाल्यास, येथील आदिवासींना नदीतून जीवघेणी कसरत करावी लागते. पाच किलोमीटरचा डोंगर तुडवत केवनाळे गाठावे लागते. तिथे गाडी भेटली तर ठीक, नाहीतर २० किमीची पायपीट करावा लागते.
वेळोवेळी मागणी करूनही पुलाचा विषय सुटलेला नाही. पावसाळ्यात वेळेत उपचार न मिळाल्याने ५ वर्षात ९ रुग्ण दगावले आहेत.
- मोहन मोडक, उपसरपंच, कुर्लोद ग्रामपंचायत.