डहाणूतील पोर्तुगीजकालीन किल्ल्यानजिक ट्रान्सफॉर्मर जळाला; युवकांच्या सतर्कतेने किल्याचे नुकसान टळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:12 AM2024-01-02T07:12:29+5:302024-01-02T07:13:41+5:30
मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना घडली असती, तर किल्ल्याचे तसेच परिसरातील रहिवासी भागाचे मोठे नुकसान झाले असते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
डहाणू गाव येथील पोर्तुगीजकालीन किल्ल्याच्या दर्शनी भागात असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये सोमवार, 1जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. स्थानिक युवकांनी तत्काळ घटनेची माहिती माजी नगरसेविकेला दिल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने दोन बंबांना रात्री साडेबाराच्या सुमारास आग विझवण्यात यश आले. मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना घडली असती, तर किल्ल्याचे तसेच परिसरातील रहिवासी भागाचे मोठे नुकसान झाले असते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
रात्री किल्ल्या परिसरात काही युवक बसले असताना ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट होऊन आग लागली. त्यांनी माजी नगरसेविका कीर्ती मेहता यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर कीर्ती यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कळवल्याने वीज खंडीत करण्यात आली. त्यानंतर अदानी थर्मल पॉवर स्टेशन तसेच डहाणू नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी उपाययोजना केल्यानंतर साडेबाराच्या सुमारास आग नियंत्रणात आली. परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
दरम्यान ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्यावर किल्ल्या लगतच्या झाडाच्या फांद्या आणि
मुळांनी पेट घेतला होता. किल्ला परिसरात शासकीय कार्यालय, छोटी हॉटेल्स आणि रहिवासी भाग असल्याने मध्यरात्री आगीची घटना घडली असती तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती अशी माहिती कीर्ती मेहता यांनी देत, तरुणांनी राखलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. घटनास्थळी माजी नगरसेवक राजू माच्छी, डहाणू पोलीस, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.