हायड्रोजन गॅसच्या टाक्या वाहून नेणारा ट्रक झाला पलटी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:45 AM2024-08-03T11:45:29+5:302024-08-03T11:45:39+5:30
यामुळे दोन्ही लेनवर ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) :-वसई फाट्याजवळ डी मार्टच्या पुढे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डिव्हायडरमध्ये हायड्रोजन गॅसच्या टाक्या वाहून नेणारा ट्रक शनिवारी पहाटेच्या सुमारास पलटी झाला आहे. यामुळे दोन्ही लेनवर ३ ते ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातातील वाहनचालक याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सदर ट्रक मुंबई- गुजरात वाहिनीच्या डिव्हायडरमध्ये पलटी झाला. या ट्रकमधील हायड्रोजन गॅसच्या टाक्या असल्याने त्या खाली रोडवरती आपटल्याने त्यास आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बुजविली असून गुजरात वहिनी वरील सर्व वाहतूक सुरक्षित अंतरावर थांबवून ठेवली आहे. सदर घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झालेली असून महामार्ग पोलिस, वाहतूक पोलीस आणि पेल्हारचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने उपाययोजना करीत आहेत.
मुंबई- ठाणे परिसरातून गुजरात दिशेला जाणाऱ्या सर्व प्रवाशी व वाहन चालकांना पोलिसांनी विनंती आहे की घटना व वाहतुक कोंडी लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.