आदिवासी भागातून ‘आखाजी’ होतेय हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:09 AM2018-04-20T00:09:28+5:302018-04-20T00:09:28+5:30
आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. केवळ एकाच दिवसापूरता आखाजी साजरा केली जात असल्याने ग्रामीण भागातूनही तो हद्दपार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्मार्टफोनमुळे ग्रामीण जीवन आधुनिक व सुकर झाले आहे. अक्षयतृतीय अर्थात आखाजी हा आदिवासी भागातील मोठा सण मानला जातो. पंचक्रोशीतील गावांमध्ये या सणाचे गांभीर्य काही वर्षांपासून कमी होत असून दरवर्षी ते प्रकर्षाने जाणवत आहे. सध्या परिसरात राब लावणीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांसह महिला व पुरुष मजूर दिवसभर शेतातच राबत आहेत. त्यामुळे गावे ओस पडली आहेत. एकुणच आधुनिक जिवनशैली मुळे संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. घराघरात अँड्रॉईड मोबाईल आल्यामुळे झोके खेळणारी मुले, मुली मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. विविध मोबाईल कंपन्यांची इंटरनेट सेवा ग्रामीण भागात पोहोचल्यामुळे मुला-मुलींसह महिलांनाही मोबाईलवरील विविध गेम ने वेड लावले आहे. त्यामुळे आखाजीच्या निमित्ताने गावातील गल्ल्यांमध्ये विशेषत: तरुणी व महिलांची रेलचेल दिसणे दुरापास्त झाले आहे.
आंब्याचा गोडवाही महागला
आखाजीच्या गोडधोड जेवणात आंब्याचे महत्व असते. यंदा वातावरणातील बदल व अवकाळी पावसामुळे मोहोर गळाल्याने फळधारणेला उशीर झाला. त्यामुळे गुजरातसह इतर राज्यांमधून आंबा दाखल झाला आहे. सध्या आंब्याची कमीतकमी १५० रु पये किलोपासून विक्र ी सुरू असल्याने तो सर्वसामान्याना परवडेनासा झाला आहे.
झाडे नसल्याने झोकेच गायब...
- झाडे लावण्यासाठी व त्यांच्या संवर्धनासाठी शासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीत आहे. परंतु काही वर्षांपासून चौकातली झाडेही हळूहळू नामशेष झाली आहेत. आखाजी म्हटल्यावर माहेरवाशिणी आपल्या गावी आल्यानंतर झोके खेळतात. आता गावात झाडेच नसल्याने आखाजी चा झोका कुठे बांधायचा हाही प्रश्न उद्भवत आहे. शेतात बांधलेल्या दोन चार झोक्यांखेरीज गावात सद्यस्थितीत कुठेच झोके दिसून येत नाही.