विद्यार्थिनींनी रचली अपहरणाची कहाणी; मीरा रोडमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 02:59 AM2020-01-26T02:59:48+5:302020-01-26T03:00:02+5:30
एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत.
मीरा रोड : आई मारते म्हणून निघून गेलेल्या चौथीच्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणीसोबत पळून विरार गाठले. पण नंतर मात्र दोघींनी बुरखाधारी महिलेसह वाहनचालकाने अपहरण केले, अशी कहाणी रचल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली.
एका विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतलनगर भागात एका खाजगी शाळेत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही ११ वर्षांच्या विद्यार्थिनी मैत्रिणी आहेत. बुधवारी सायंकाळी शाळेतून सुटल्या असता होली क्रॉस शाळेसमोरील रस्त्यावर अचानक पांढºया रंगाची गाडी आली. त्यातून एक बुरखाधारी महिला बाहेर आली आणि दोघींना गाडीत बसवले. गाडी चालवणाºयानेही तोंडावर मास्क घातले होते. गाडीची काच बंद असल्याने मदतीसाठी आरडाओरडा करूनही आवाज बाहेर गेला नाही. महिलेने चाकूचा धाक दाखवून ओरडणे बंद करण्याचा दम दिला. त्यामुळे दोघींनी ओरडणे बंद केले.
गाडी बरीच पुढे गेली असता संधी साधून एकीने महिलेच्या हाताचा चावा घेतला. तर, दुसरीने गाडीचे दार उघडत दोघी धावल्या. चालकाने पाठलाग केला, परंतु वर्दळ असल्याने तो मागे फिरला. दोघींनी तेथे असलेल्या सरबतविक्रेत्यास विचारणा केली असता त्या विरार पश्चिमेला असल्याचे कळले. सरबतवाल्याकडून मोबाइल घेऊन आईला फोन केला व घडलेला प्रकार सांगितला.
विरार पोलीस ठाण्यात फिर्यादीसाठी गेल्यावर तेथील पोलिसांनी त्यांना नयानगर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. गुरुवारी मुलीच्या फिर्यादीनंतर नयानगर पोलिसांनी बुरखाधारी महिला व चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलीस तपासात मात्र अपहरणाचा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. शाळेत दिलेला अभ्यास झाला नसल्याने घरचे मारतील, या भीतीने दोघींनी शाळा सुटल्यावर थेट विरार गाठले.
विरारला त्या लोकलने गेल्याचा संशय आहे. विरार पश्चिमेस सरबतविक्रेत्यास या दोघी मुली दिसल्याने त्याने दोघींची विचारपूस केली. दोघी मुली मीरा रोडच्या असल्याचे कळल्याने त्याने एकीकडून तिच्या आईचा मोबाइल क्रमांक घेऊन दोघी मुली विरारला आपल्याकडे सुखरूप असल्याचे कळविले.
तपासात खरे झाले उघड
घरचे मारतील म्हणून या दोघींनी अपहरणाची कहाणी रचली असल्याची माहिती सहायक निरीक्षक सुभाष ठाकूर यांनी दिली. मुलींनी आधी अपहरणाची माहिती दिल्याने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पण, तपासात मुलींनी नेमका प्रकार सांगितला. मुली मिळाल्याचे कळताच पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तेही कहाणीने चक्रावून गेले.