लोकांचे पैसे देणे टाळण्यासाठी केलेला अपहरणाचा बनाव उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:37 PM2021-02-08T23:37:10+5:302021-02-08T23:37:25+5:30
वालीव पोलिसांचे यश : ‘त्या’ व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार
नालासाेपारा : बँकेत चेक टाकण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय वडिलांचे कोणी अपहरण केले असल्याचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, पण अपहरण झालेली व्यक्ती पोलिसांना सापडल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीने अनेक नागरिकांकडून लाखो रुपये घेतले आहे. ते घेतलेले पैसे परत देण्याचे टाळण्यासाठी अपहरण झाल्याचा बनाव करण्यात आला होता. वालीव पोलिसांनी गुजरात राज्यातून सदर व्यक्तीला आणले आहे.
विरारच्या खानीवडे येथील हनुमाननगरमध्ये राहणारे रामसजीवन पाल (५५) हे १८ जानेवारीला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पेल्हार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत चेक टाकण्यासाठी गेले होते. तेव्हापासून ते घरी परतले नाहीत, म्हणून घरच्यांनी आजूबाजूला शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. शेवटी १९ जानेवारीला त्यांचा मुलगा रामराज पाल (२८) याने वालीव पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत, अनेक पोलीस ठाण्यात फोटो व माहिती पाठवून याचा काही पत्ता मिळतो का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. वालीवचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम सर्व ठिकाणी, तसेच अनेक पोलीस ठाण्यात जाऊन काही थांगपत्ता लागतो का, याचा शोध घेत तपास करत होते. नाशिक, ठाणे, पुणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणीही शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. माहितीच्या आधारे गुजरात राज्यातील वापी या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी वापी या ठिकाणी घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या रामसजीवन पाल याला रविवारी आणले. याने अनेक लोकांकडून लाखो रुपये घेतले असून, तक्रारदार आल्यावर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याचे वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.