अबोलीवरील अन्याय सहन करणार नाही, निषेध मोर्चा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 03:10 AM2018-09-01T03:10:29+5:302018-09-01T03:11:02+5:30
विरार मधील महिला रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रामध्ये आधीच
नालासोपारा : विरार मधील महिला रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुरुषी मक्तेदारीच्या क्षेत्रामध्ये आधीच त्रस्त असलेल्या या महिला रिक्षाचालकाने ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, आॅटो रिक्षा चालक मालक संघाकडून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
महिलांनी रिक्षा चालून उदरनिर्वाह करावा यासाठी राज्य शासनाने अबोली योजनेअंतर्गत महिलांना ५ टक्के राखीव कोट्यातून रिक्षाचे परवाने दिले. मात्र, विरार मध्ये त्यांना पुरूष रिक्षाचालकांकडून शिवीगाळ, मारहाण तसेच खोट्या तक्र ारींचा सामना करावा लागत असल्याने त्या मेटाकुटीला आल्या आहेत. महिला रिक्षाचालक प्रवासी घेत असताना त्यांच्यामध्ये रिक्षा घुसवून प्रवासी भरणे, अश्लिल शेरेबाजी करणे, क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करणे असे प्रकार केले जात आहेत. या विरोधात महिला रिक्षाचालक दर्शिका विसावाडिया हिने आवाज उठवून विविध ठिकाणी तक्र ारी केल्या आहेत. वाहतूक पोलीसही आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी पुरूष रिक्षाचालकांची बाजू घेत असल्याचा तिचा आरोप आहे. तिने स्वतंत्र रिक्षा स्टँड देण्याची मागणी केली होती. मात्र ती पुर्ण झाली नाही. दरम्यान, बुधवारी दर्शिका विसावाडिया ही महिला रिक्षाचालक विरार स्थानकाबाहेर प्रवासी भरत असताना महिला पोलिसाने तिला अडवले आणि प्रवासी उतरविण्यास सांगितले. तसेच तिला पुरूषांच्या रिक्षास्टॅँड मध्ये जाण्यास फर्मावले. त्यास नकार दिल्यावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी दर्शिकाने अंगावर रिक्षा नेल्याचा आरोप करत महिला पोलीस आरती जाधव यांनी तिच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिविगाळ आदी विविध कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला.
माझ्यावरील आरोप खोटे असून पोलिसांना हाताशी धरून आमचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. पुरूष रिक्षाचालक त्यांच्या स्टँडमध्ये आंम्हाला रिक्षा लावू देत नाही, मग आम्ही व्यवसाय कसा करायचा. आधीच व्यवसाय नाही, त्यात रिक्षाचे कर्ज डोक्यावर असताना असा मानसिक छळ होत आहे.
- दर्शिका विसावाडिया, महिला रिक्षाचालक
विरार पोलिसांनी योग्य कारवाई केल्याचे सांगत विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम आढाव यांनी महिला रिक्षाचालक दर्शिकाने केलेल्या गुन्ह्याचे साक्षीदार आहेत म्हणून गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले.