जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करुन फरार; आरोपींना अंधेरी, सुरतमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:47 PM2024-01-19T16:47:38+5:302024-01-19T16:48:21+5:30
विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारमधील आरटीआय कार्यकर्त्याच्या घरावर गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अंधेरी व सुरतमधून अटक करत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मुख्य आरोपीने दोघांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विरारच्या गोपचर पाडा येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये राहणारा आरटीआय कार्यकर्ता मोबिन शेख (४३) ह्याच्या घरावर सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घराचा दरवाजा कुणीतरी ठोठावला पण त्यांनी दरवाजा उघडला नव्हता. त्याचवेळी हल्लेखोरांनी घराच्या खिडकीतून गोळी झाडली होती. मात्र झाडलेली गोळी खिडकीतून भिंतीला लागल्याने जीवितहानी झाली नव्हती. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विरार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवून चार वेगवेगळी पथके तयार केली.
घटनास्थळी मिळालेले प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर माहितीचे आधारे गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हा करण्यासाठी दुचाकीचा वापर केल्याचे दिसून आले. त्या दुचाकीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपीपैकी एक आरोपी मोहित ठाकूर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अंधरेई येथून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याला मस्तान शेख याने मोबिन शेखला जीवे ठार मारण्याची दोघांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती दिली. त्यानंतर तांत्रिक व मिळालेल्या माहितीच्या आधारे मस्तान शेख (३९) आणि अजय ठाकूर (२१) या दोघांना सुरत येथे पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना विरार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, १ खाली केस, २ सुरे, १ दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, हर्षद चव्हाण, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, दतात्रय पगार, संदीप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल्ल सोनार, नामदेव ढोणे, संतोष खेमनर यांनी केली आहे.