जयसागर धरणात मुबलक पाणीसाठा; जव्हारकरांची पाण्याची चिंता दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 02:45 AM2020-05-09T02:45:36+5:302020-05-09T02:45:52+5:30

गेल्यावर्षी जून महिन्यातच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जयसागर डॅमही पूर्णपणे कोरडा झाला होता

Abundant water storage in Jaisagar Dam; Jawaharkar's water worries removed | जयसागर धरणात मुबलक पाणीसाठा; जव्हारकरांची पाण्याची चिंता दूर

जयसागर धरणात मुबलक पाणीसाठा; जव्हारकरांची पाण्याची चिंता दूर

Next

जव्हार : जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर डॅममध्ये पाण्याचा मुबलक साठा असून पावसाळा जरी उशीरा सुरू झाला तरी जव्हारकरांना नेहमीप्रमाणे आठवडाभर पाणी पुरवठा करता येणार असल्याची माहिती जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिली.

मार्च महिना उलटला की जिल्ह्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होऊन टॅँकर आणि इतर स्रोतांद्वारे पाणी पुरवठा केला जातो. जव्हारसाठी श्रीमंत राजे यशवंत यांनी बांधलेल्या जयसागर धरणात मुबलक पाणी असल्याने यंदा जव्हारचा प्रश्न सुटला आहे. वर्षभराचे नियोजन आखल्यानेच हे शक्य झाल्याचेही बोरकर यांनी सांगितले.

गेल्यावर्षी जून महिन्यातच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. जयसागर डॅमही पूर्णपणे कोरडा झाला होता. त्यामुळे जवळपास महिनाभर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. काही लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पाणी पुरवले जात होते. सुदैवाने तशी परिस्थिती यंदा नाही. जयसागर डॅमची उंची वाढविण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू होते. मात्र, अचानक लॉकडाउन झाल्याने काम बंद झाले आहे. उंची जरी वाढली नसली तरी यंदा येथे पुरेसा पाणीसाठा आहे.

यंदा पावसाळा जरी उशिराने सुरू झाला तरी शहरात पाणीटंचाई भासणार नाही. धरणात मुबलक पाणीसाठा असून १५ जूनपर्यंत आठवड्यातून पाच दिवस नियमितरीत्या पाणीपुरवठा केला जाणार आहे. - प्रसाद बोरकर, मुख्याधिकारी जव्हार नगर परिषद

Web Title: Abundant water storage in Jaisagar Dam; Jawaharkar's water worries removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी