कर्जवसुलीसाठी पोलिसाला शिवीगाळ; बँकेतील महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:45 AM2023-12-10T09:45:08+5:302023-12-10T09:45:58+5:30
ॲक्सिस बँकेच्या कर्जवसुली शाखेतील महिलांनी कर्जवसुलीसाठी वसईच्या पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नालासोपारा : ॲक्सिस बँकेच्या कर्जवसुली शाखेतील महिलांनी कर्जवसुलीसाठी वसईच्या पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी शुक्रवारी तक्रार करत ॲक्सिस बँकेच्या ८ मोबाइल क्रमांकांवरून फोन करणाऱ्या महिलांविरोधात वसई पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
वसई पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने ॲक्सिस बँकेकडून साडेसहा लाखांचे कर्ज घेतले होते. वैयक्तिक कारणांमुळे त्याला तीन हप्ते भरता आले नव्हते. त्याची रक्कम ४५ हजार एवढी थकली होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पोलिसाला, कुटुंबीयांना, नातेवाइकांना धमक्यांचे फोन केले. वसई पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तुमच्या सहकाऱ्याने ३ हप्ते थकवले आहे. ते पैसे तुम्ही भरा किंवा त्याला हजर करा, असे सांगण्यात आले.
कर्जवसुली करणाऱ्या या एजंटांची दादागिरी प्रचंड आहे. ते जर पोलिसांना अशा धमक्या देत असतील, तर सामान्यांचे काय होत असेल? बँकेने या एजंटला नेमले असल्याने बँकदेखील जबाबदार आहे. चौकशीमध्ये सर्वांवर कारवाई केली जाईल, म्हणून त्या महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
- रणजीत आंधळे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वसई
फोन करून धमकावत होते
कर्जवसुली करणारे एजंट सर्व पोलिस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या क्रमांकाने फोन करून धमकावत होते. तुम्ही पोलिस असलात तरी नोकरी घालवू, रस्त्यावर आणून बरबाद करू, कायमस्वरूपी संपविण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करत होते. अखेर पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी तक्रार केली.