लाचखोर मनपा कर्मचाऱ्याला एसीबीने पकडले; मनपाच्या ई प्रभागात बुधवारी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:55 PM2023-11-29T20:55:37+5:302023-11-29T20:56:01+5:30
नालासोपारा पोलीस ठाण्यात खंडणीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) - पश्चिमेकडील मनपाच्या ई प्रभागातील घरपट्टी विभागात काम करणाऱ्या लाचखोराला लिपिकाला ठाण्याच्या लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी २० हजारांची रोख रक्कम स्विकारताना बुधवारी संध्याकाळी पकडले आहे. दृमील किणी (३४) असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात खंडणीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांचे दुकानाचे घरपट्टी नावावर करण्यासाठी ई प्रभाग समिती येथे अर्ज केला होता. घरपट्टी नावावर करून देण्यासाठी लोकसेवक दृमील किणी यांनी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तडजोडी अंती २० हजार रुपये लाचेची मागणी केली असता पडताळणी करून सापळा कारवाई दरम्यान लोकसेवकास रंगेहात पकडण्यात आले आहे. यात नेमके कोण कोण सहभागी आहेत. याचा तपास करत आहे.
ई प्रभागात लाचलुचपत विभागाची धाड पडल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. पोलीस निरीक्षक संतोष अंबिके, पोलीस हवालदार संदिप सांबरे, विनायक जगताप, प्रीती जाधव आणि नवनीत सानप यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.