कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:58 AM2021-01-09T00:58:32+5:302021-01-09T00:58:52+5:30

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रात यशस्वी रंगीत तालीम

Accelerate the preparation for corona vaccination | कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग

कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या हालचालींनी वेग धरला असून लसीकरणासाठीची रंगीत तालीम (ड्राय रन) शुक्रवारी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मासवण आश्रमशाळा येथे जि.प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे, जिल्हाधिकारी 
डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या विशेष देखरेखीखाली पार पडली.


जिल्ह्यातील एकूण १६,००० कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी ही ड्राय रन आयोजित करण्यात आली असून कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे. लस घेतेवेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तत्काळ त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. लस घेणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती ओळखपत्रे, कागदपत्रे सोबत घेऊन जावीत, अशी माहिती जिल्हाधिऱ्यांनी देऊन ही रंगीत तालीम म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण असल्याचे मत व्यक्त केले.
जिल्ह्याला ही लस प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात आशा, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११ हजार ९१३, खासगी शहरी व ग्रामीण भागातील ५ हजार ४९८ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षांवरील सर्व नागरिक व ५० वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 
लसीकरणसंदर्भात आवश्यक असलेल्या बाबींची पूर्वतयारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमांचे पालन करून ही रंगीत तालीम घेतली गेली. या वेळी प्रत्यक्षात लस टोचली नसली तरी लस टोचण्यासाठी झालेली पूर्वतयारी याची पाहणी या वेळी उपस्थित मान्यवरांनी केली. या वेळी जि.प. सदस्या अनुश्री पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे, आयुष अधिकारी डॉ. तन्वीर शेख, डॉ. महेश बडगुजर, इतर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Web Title: Accelerate the preparation for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.