‘ओव्हरलोड’ अवजड वाहनांमुळे अपघात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:28 PM2019-12-09T23:28:06+5:302019-12-09T23:28:22+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे.
मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या असून ‘ओव्हरलोड’मुळे हे प्रकार घडत आहेत. मात्र आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलीस अधिकारी व कर्मचारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे पूर्वी रुंदीकरण, त्यानंतर चौपदरीकरण आणि आता सहापदरीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आदी भागांतून आलेले हजारोे ट्रेलर व इतर अवजड वाहने या महामार्गावरून धावतात. ही वाहने मर्यादेपेक्षा जास्त माल भरून नियमांचे उल्लंघन करीत असतात. तसेच अनेक वाहनांची मागची पार्किंग सिग्नल लाईट बंद असते. नंबर प्लेटही नीटपणे दिसत नाही.
पीयूसी असूनही काळा धूर निघतो, अशा अनेक त्रुटी असलेली वाहने या मार्गावरून धावत असल्याचे निदर्शनास येत असते. अशा वाहनांमुळे रात्री तसेच दिवसाही अपघात होत असतात. मात्र तरीही आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलीस कारवाई करीत नाहीत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
कारवाई करीत असल्याचा पोलिसांचा दावा
आरटीओचे अधिकारी अनिल पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेस येथील सपोनि दिंडे यांच्याशी संपर्क साधला असता, अवजड मोटरवाहनांवर अद्यापपर्यंत भरपूर कारवाई केली आहे व पुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या चालकांवर व मोटर वाहनांवरही कारवाई केली जात आहे, असे असे ते म्हणाले.