वसई कला क्रीडा महोत्सवा दरम्यान दुर्घटना; प्रेक्षक गॅलरी कोसळून १६ ते १७ मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:53 AM2023-12-30T10:53:41+5:302023-12-30T10:54:53+5:30
शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
नालासोपारा (मंगेश कराळे) - वसईत सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवातील खो- खो सामन्या दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ ते १७ मुले किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमी खेळाडू आणि प्रेक्षकांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.
मनपा आणि वसई कला क्रीडा महोत्सवाच्या वतीने वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर ३४ वा कला क्रीडा महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी या कला क्रीड महोत्सवाचा ४ था दिवस होता. मैदानावर विविध खेळांचे सामने रंगले होते. खो-खो सामन्याच्या वेळी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे साडेसातच्या सुमारास गॅलरी अचानक कोसळली. यामध्ये एकूण १६ ते १७ मुले जखमी झाले. त्यात खेळाडूंसह सामना बघण्यासाठी आलेल्यांचा समावेश होता. सर्व जखमींना वसई पारनाका येथील महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व जखमीना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले. दोघांनी पोटात दुखत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांच्या एक्सरे तपासणीत काही आढूळून आले नाही. सर्व रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
या दुर्घटनेनंतर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, भाजपाचे नेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. खोखोचा सामना रंगतदार होता त्यामुळे उत्साहात क्षमतेपेक्षा समर्थक प्रेक्षक गॅलरीत चढले. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. आजवर महोत्सवात अशी दुर्घटना कधी घडली नव्हती. परंतु यापुढे आम्ही आयोजनात अधिक काळजी घेऊ असेही त्यांनी सांगितले. दुर्घटनेंतर महोत्सवातील इतर सामने सुरळीत सुरू होते. या दुघटनेत १६ ते १७ मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत तर एका लहान मुलाचा पाय फॅक्चर झाल्याने त्याचे प्लास्टर झाल्यानंतर घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी लोकमतला सांगितले.