जीवदानी मंदिराच्या केबल ट्रेनचे काम करताना अपघात; दोन मजुरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 07:43 PM2020-01-13T19:43:36+5:302020-01-13T19:47:36+5:30
याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विरार - विरारच्या प्रसिध्द जीवदानी मंदिराच्या केबल रेल्वेचे (फनिक्युलर) काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. मंदिराचा रोप वे सुरक्षित असून भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जयवंत हडळ (४५) सफाळे आणि गणेश वायडा (२३) अशी या दुर्घटनेत मरण पावलेल्या मजूरांची नावे आहेत. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विरार - जीवदानी मंदिराच्या केबल ट्रेनचे काम सुरू असताना दोन मजूरांचा पडून मृत्यू https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 13, 2020
विरार पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जीवदानी देवीचे प्रसिध्द मंदिर आहे. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या तसेच ट्रॉलीने जाण्यासाठी रोप वे आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरात जाण्यासाठी केबल रेल्वेचे (फनिक्लुयर) काम सुरू होते. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हे काम सुरू असताना दोन मजूर अचानक तोल जाऊन डोंगरावरून खाली पडले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद कऱण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी दिली. घडलेली घटना दुर्देवी असून काम करताना तोल गेल्याने हे मजूर पडले, आम्ही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. असे जीवदानी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड यांनी सांगितले. मंदिरात भाविकांना जाण्यासाठी असलेला रोप वे मात्र सुरक्षित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.