विरारमध्ये भरदिवसा बंगल्यात घुसून चौघांवर चाकूहल्ला, आरोपीने हाताची नस घेतली कापून; हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 07:57 AM2021-03-14T07:57:43+5:302021-03-14T07:59:13+5:30
विरार पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह चारही जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला का आणि कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस शोध घेत असून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा/पारोळ : विरारच्या खानिवडे गावातील एका बंगल्यात २३ वर्षीय आरोपीने शनिवारी सकाळी दिवसाढवळ्या चौघांवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने घाबरून बाथरूममध्ये बंद करून हाताची नस कापून घेतली आहे.
विरार पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह चारही जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला का आणि कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस शोध घेत असून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. विरारच्या खानिवडे गावात राजेश कमलाकर तरे हे आपल्या परिवारासह राहतात. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी सूरज आंबेकर (२३) हा धारदार चाकू घेऊन तरे यांच्या बंगल्यात घुसला. आरोपीने त्यांच्या दोन्ही मुलींवर चाकूने सपासप वार करून रक्तबंबाळ केले. तर दुखवट्यासाठी आलेले राजेश यांचे नातेवाईक रमेश तरे व त्यांची भावजय अंजली तरे यांनी वाचवण्यासाठी मध्ये पडताच त्यांच्यावरही वार केले.
बंगल्यामध्ये हल्ला झाल्यानंतर आरडाओरडा झाल्यावर जमलेल्या गावकऱ्यांनी या घटनेची खबर विरार पोलिसांना दिली. पोलीस आल्यावर आरोपीने स्वतःला बाथरूममध्ये बंद करून डाव्या हाताची नस कापून घेतली. दरम्यान, या चाकूहल्ल्याने घरभर रक्ताचा सडा पडला होता. गावकऱ्यांच्या साहाय्याने पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा फोडून सावधगिरीने आरोपीला बाहेर काढून ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्यल्दाखल केले आहे. गावकऱ्यांनी चारही जखमींना विरार येथील संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे.
आरोपीने शनिवारी सकाळी घरात घुसून चाकूने चौघांवर हल्ला केला आहे. यात दोन्ही तरुणींच्या हातावर, पायावर, पोटावर वार केल्याने गंभीर जखमा झाल्या असून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. आरोपीनेही हाताची नस कापून घेतली असल्याने त्यालाही ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. आरोपीविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याने हा हल्ला का व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध घेत तपास करत आहोत.
- सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
विरार पोलीस ठाणे