बेकायदेशीर गर्दी आणि मारामारी करुन दहशत माजविणाऱ्या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 06:22 PM2023-06-02T18:22:48+5:302023-06-02T18:24:10+5:30
गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): बेकायदेशीर गर्दी व मारामारी करुन अग्निशस्त्राने दहशत माजविणाऱ्या आरोपीला अग्निशस्त्रासह गुरुवारी अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शुक्रवारी दिली आहे.
यशवंत गौरवच्या आयान रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या अब्दुल मजीद कुरेशी (४५) यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. २० मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास मौजे धानिवबाग येथे सर्व्हे क्रमांक ११, हिस्सा नंबर १/१ मध्ये उस्मान शेख, तारीख शेख, अमन शेख, फरमान शेख व चार ते पाच आरोपींनी त्यांना हाताने, लाथाबुक्यानी, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. तसेच अमन शेख यानी पिस्तूलचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पेल्हार पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयांतर्गत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारे आरोपीतांबाबत वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन त्यांचा शोध घेवुन गुन्हयांना पायबंद घालणेबाबत सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाव्दारे प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी अमानउल्ला मोहम्मद तलत शेख ऊर्फ टायगर याला वाकणपाडा येथून गुरुवारी ५० हजार ५०० रुपये किंमतीचे एक पिस्तुल व एक जिवंत काडतुसासह पकडले. आरोपीला पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.