शादी डॉट कॉमवरून महिलांशी ओळख करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला कल्याण मधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:38 PM2024-07-25T16:38:45+5:302024-07-25T16:41:31+5:30
...त्याने आतापर्यंत २० ते २५ घटस्फोटीत व विधवा महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मंगेश कराळे -
नालासोपारा - शादी डॉट कॉम या सोशल मीडियाच्या साईटवरून घटस्फोटीत व विधवा महिलांशी ओळख करून जवळीक साधत फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी कल्याण येथून बुधवारी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी दिली आहे. त्याने आतापर्यंत २० ते २५ घटस्फोटीत व विधवा महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी फिरोज नियाज शेख याने पीडित महिलेसोबत शादी डॉट कॉम या संकेत स्थळावरून ओळख करून यापूर्वी विवाह झालेले असल्याचे लपवून तिचेसोबत विवाह केला. त्यानंतर तिचेकडून लॅपटॉप व कार घेण्यासाठी ६ लाख ५० हजार ७९० रुपये घेऊन फसवणूक करून त्यांचे रकमेचा अपहार करून तिला सोडुन पळून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपीचा शोध घेत त्याची काही माहिती मिळते याचा तपास करत होते.
आरोपी हा कल्याण येथे असल्याची माहिती मिळाल्यावर नालासोपारा पोलिसांनी बुधवारी सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा शादी डॉट या संकेत स्थळावरून घटस्फोटीत महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून किंवा लग्न करून त्यांचेशी जवळीक निर्माण करतो. त्यानंतर सदर महिलेकडील सर्व सोने चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पळून जातो. अशा प्रकारची मोडस असलेल्या आरोपीच्या अंग झडतीमध्ये ३ लाख २१ हजार ४९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये महिलांचे एटीएम कार्ड, चेकबुक, ६ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोने-चांदीचे दागिने असा मुद्देमाल मिळाला आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.