मोक्कामध्ये १० वर्षे शिक्षा भोगून सुटलेल्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अग्नीशस्त्रासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:13 PM2022-11-30T22:13:52+5:302022-11-30T22:18:23+5:30
आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मंगेश कराळे
मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यात नाशिक जेलमध्ये १० वर्षे शिक्षा भोगून सुटलेल्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने १ अग्निशस्त्र, ८ जिवंत काडतुसे आणि रोख रकमेसह मंगळवारी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिरा-भाईन्दर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील विशेषत: वसई-विरार परिसरात अवैध शस्त्रांवर आळा बसणे करिता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शनात्मक सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार गोपनीय माहिती काढून कर्तव्य करित असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे यांना एकाकडे अग्नीशत्र असल्याची माहिती मिळाली. तसेच तो रशिद कंपाउंड याठिकाणी येणार असल्याची बातमी समजली. सदर बातमीचे अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटिकरण पथकाने सापळा रचून मंगळवारी अजय बलराम मंडल (३५) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे विनापरवाना १ गावठी बनावटीचा कट्टा, ८ जिवंत पितळी धातुचे काडतुसे व रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस आयुक्तालयात प्राणघातक हत्यारे जवळ बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग केल्याने त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी अजय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध डीसीबी मुंबई, एल टी मार्ग, आर ऐ के मार्ग या पोलीस ठाण्यात मोक्का, दरोडा, आर्म्स ऍक्ट, सरकारी कामात अडथळा असे आठ गुन्हे दाखल आहेत.
आरोपीला बुधवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वसंत लब्दे
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)