बिहारमध्ये निर्घृण खून करून पळून आलेल्या आरोपीला नायगांवमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:22 PM2024-03-27T16:22:47+5:302024-03-27T16:27:13+5:30
बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रोह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारापांडेया गावातील सरीतादेवी रंजक यांचे पती सुनील रंजक हे हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्याचवेळी या गावाच्या हद्दीत एक ६ तुकड्यांत कापलेले मृत पुरुषाचा मृतदेह सापडला होता. सदरचा मृतदेह सरितादेवींना दाखविल्यावर तो पतीचाच असल्याचे त्यांनी ओळखले.
मंगेश कराळे -
नालासोपारा : बिहार राज्यात निर्घृणपणे खून करून पळून आलेल्या आरोपीला नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रोह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारापांडेया गावातील सरीतादेवी रंजक यांचे पती सुनील रंजक हे हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्याचवेळी या गावाच्या हद्दीत एक ६ तुकड्यांत कापलेले मृत पुरुषाचा मृतदेह सापडला होता. सदरचा मृतदेह सरितादेवींना दाखविल्यावर तो पतीचाच असल्याचे त्यांनी ओळखले. रोह पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपी चिंचोटी परिसरात आल्याची माहिती बिहार पोलिसांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांना कळविले. त्यांनी ही माहिती नायगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना कळवून आरोपीला पकडण्याचे आदेश दिले. नायगांवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपीची कसून शोध मोहीम सुरू केली.
संशयित आरोपी सुजित उर्फ सूरज सिंग (३१) हा चिंचोटीच्या पाटील पाडा येथील साडी कंपाऊंड येथून मिळून आला. आरोपीकडे चौकशी केल्यावर त्याने हा गुन्हा साथीदार रंजनिश शर्मा या साथीदाराच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे. तसेच ही हत्या त्याने सरीतादेवी हिच्या सांगण्यावरून केली असल्याचे सांगितल्यानंतर नायगांव पोलिसांनी बिहार पोलिसांना आरोपी रंजनिश शर्मा आणि मृतकाची पत्नी सरितादेवीला ताब्यात घेण्यासाठी कळविले. आरोपीकडे अजून काही अशाच प्रकाराचे गुन्हे केले अगर कसे याबाबत अधिक चौकशी केल्यावर त्याने १६ वर्षापूर्वी जुन्या भांडणाचा मनात राग धरुन बिहारच्या मौजे बरडकी खारांकला या गायचा मुखीया राजकुमार कानु व त्याचा मित्र यादव यांचा दुहेरी खुन केल्याची कबुली दिली. याबाबत सहर पोलीस ठाण्यास कळविले असून आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी रोह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले - श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशा) मंगेश अंधारे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि गणेश केकान, रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहिते, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, संजय बनसोडे, मसुब सिद्धेश्वर क्षीरसागर यांनी केली आहे.