कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांवरील कारवाई कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 12:06 AM2021-03-08T00:06:07+5:302021-03-08T00:06:22+5:30
वाहनचालकांकडून सातत्याने नियमभंग : दुचाकीस्वारांमध्ये फॅड, वाहतूक पोलिसांचा कानाडोळा
मंगेश कराळे
नालासोपारा : रस्त्यावर थोडावेळ जरी वाहतूक थांबली की, कर्णकर्कश हॉर्न वाजवत राहण्याचे फॅड वाहनचालकांमध्ये विशेषत: दुचाकीस्वारांमध्ये वाढले आहे. काही जणांना तर इतकी घाई असते की, पूर्ण रस्ता मोकळा होईपर्यंत हॉर्न वाजवत बसतात. अशा वाहनचालकांवर, दुचाकीस्वारांवर आणि रिक्षांवर कारवाई करणे खूप गरजेचे झाले आहे, पण वाहतूक पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याने वाहनचालकांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कारवाई केल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्यावर्षात कोरोना असल्यामुळे ही कारवाई करता आली नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. सध्या रिक्षांमध्ये लावण्यात आलेला डीजे, कर्णकर्कश हॉर्न आणि फटाके फोडणारे सायलेन्सर वाहनांवर कारवाईचे दावे कागदावरच असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी, कॉलेज, शाळा, क्लासेस, मॉलच्या जवळ मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजवून किंवा सायलेन्सरद्वारे फटाके फोडून लोकांना, महिलांना, तरुण-तरुणींना आकर्षित करण्याची एक फॅशन झाली आहे. जोरजोरात हॉर्न वाजवून वेगाने दुचाकी चालवणाऱ्या तरुणांमध्ये वाढ झाली आहे.
काही दुचाकीस्वार तरुणांमध्ये एकमेकांना खुन्नस देण्यासाठी हॉर्न वाजविण्याचे प्रकार घडत असून याचे रूपांतर नंतर वादात, भांडणात झाले आहे. वाहतुकीच्या नियमांनुसार हॉर्न कधी व कशासाठी वाजवावेत, कुठे वाजवू नयेत याचेही काही नियम आहेत. हॉस्पिटल, सरकारी कार्यालये, कोर्ट, शाळा, कॉलेज अशा ठिकाणी ‘नो हॉर्न’ असा फलक लावलेला असतो. परंतु, या ठिकाणी बिनधास्तपणे नियम पायदळी तुडवून हॉर्न वाजवला जातो. काही दुचाकीस्वारांनी तर पोलिसांचा सायरन लावला आहे.
कारवाई होतेय कुठे?
कर्णकर्कश हॉर्न आणि सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे आवाज करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कारवाई करत असल्याचे वाहतूक पोलिसांचे दावे कितपत खरे आहेत, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कारवाईत आर्थिक दंडाची तरतूद
शहरात दुचाकी वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनांमध्ये आणि दुचाकींमध्ये मोडिफिकेशन करून जास्त आवाजाचे सायलेन्सर, हॉर्न बसविण्यात येतात. मोटार वाहन कायद्याअंतर्गत ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉर्न व फटाके फोडणारे सायलेन्सर असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे, पण वाहतूक पोलिसांनी कानाडोळा करीत ठोस कारवाई करत नाही. त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कारवाई केली आहे.
आमच्या विभागाकडून कारवाई सुरूच असते आणि ती सुरूच राहणार आहे. आता या वाहनांवर, दुचाकींवर कारवाई करण्यासाठी लवकरच विशेष मोहीम हाती घेणार असून वाहतूक विभागाच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देणार आहे.
- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई
वाहतूककोंडी असल्यावर हॉर्नचा वापर सातत्याने केला जातो, पण याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. कोरोनाकाळात सहा ते सात महिने कारवाईत काही प्रमाणात शिथिलता आल्याने ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांचे चांगले फावले आहे.