परिवहन स्टँडविरोधात कारवाई होणार, नालासोपारा स्टँडमधील अवैध पार्किंगविरोधात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:17 AM2018-01-23T02:17:13+5:302018-01-23T02:17:17+5:30
अवघ्या दोन दिवसांसाठी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारलेल्या बस स्टँडच्या विरोधात एसटी महामंडळ कारवाई करणार आहे.
शशी करपे
वसई : अवघ्या दोन दिवसांसाठी दिलेल्या जागेवर महापालिकेच्या परिवहन सेवेने उभारलेल्या बस स्टँडच्या विरोधात एसटी महामंडळ कारवाई करणार आहे. त्याचबरोबर नालासोपारा एसटी स्टँडमधील बेकायदा पार्किंगवर पोलिसांच्या मदतीने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तर मुंबई हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जनआंदोलन समिती एसटी आणि परिवहन सेवेविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे.
नालासोपारा एसटी स्टँडमध्ये सध्या खाजगी व चारचाकी वाहनांनी बेकायदा पार्किंग सुरु केले आहे. त्यातच रिक्शा चालकांनी अतिक्रमण करून बेकायदा स्टँड तयार केला आहे. गेल्या आठवड्यात रिक्शांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांना एका रिक्षा चालकाने धक्काबुक्की केली होती. ही कमी म्हणून की काय आता तर वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने चक्क बस स्टँड तयार केले आहे.
एसटी स्टँडच्या दोनशे मीटर परिसरात खाजगी प्रवासी वाहनांना प्रवेश करण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, स्थानिक अधिकाºयांनीच कायदा मोडीत काढला आहे. या बेकायका पार्किंगविरोधात एसटीचे स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालघर विभागीय नियंत्रक अजित गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. स्टँडमधील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली आहे. वसईचे अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांच्या समवेत त्यांनी बैठक घेऊन ही मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच स्टँडमधील पार्किंग हटवण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. आता ही कार्यवाही प्रत्यक्षात कधी आणि कशी सुरू होते याकडे संपूर्ण वसई, विरारकरांचे लक्ष लागून राहिलेल
आहे.
अवमान याचिका दाखल होणार-
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी आणि परिवहन सेवेने सेवा द्यावी असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, एसटीने काही शालेय प्रवासी सेवा वगळता १३ डिसेंबरपासून वसई आणि नालासोपारा एसटी डेपोतील शहरी वाहतूक बंद केली आहे. नालासोपारा डेपोतून सत्पाळा मार्गे राजोडी उमराळे हीच एसटी सुरु ठेवली आहे. तर वसई डेपोतून फक्त रानगाव एसटी सुरु ठेवण्यात आलेली आहे. दुसरीकडे, एसटी प्रमाणे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार बस सेवा देण्यात महापालिकेची परिवहन सेवा अपयशी ठरली आहे.
एसटी पहाटेच्या पहिल्या लोकलपासून शेवटच्या लोकलपर्यंत बस सेवा देत होती. पण, महापालिकेच्या बहुतांश सेवा रात्री दहाच्या सुमारास बंद होत आहेत. तर पहाटे सहानंतरच सेवा सुरु केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप जनआंदोलन समितीच्या कार्याध्यक्षा व याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी केला आहे. एसटी आणि परिवहन सेवेने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली जाणार आहे, असे डाबरे यांनी सांगितले.