तारापूरच्या ६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई
By admin | Published: April 26, 2017 12:02 AM2017-04-26T00:02:57+5:302017-04-26T00:02:57+5:30
पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एम. आय. डी. सी. मधील सहा उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद ची करवाई केली आहे.
पंकज राऊत / बोईसर
पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एम. आय. डी. सी. मधील सहा उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद ची करवाई केली आहे. तसेच दोन उद्योग तात्पुरते बंद तर एका उद्योगाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. डिसेंबर २०१६ पासून ही तिसरी करवाई असून या पूर्वी एकूण ४९ उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे.
तारापूर एमआयडीसीतील उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रि या न करताच ते सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचा पर्यावरण व किनारपट्टी भागात गंभीर परिणाम होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्या होत्या. लवादाने त्यांची गंभीर दखल घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक करवाई सुरु आहे
डिसेंबर २०१६ रोजी ३२ उद्योग त्यानंतर फेब्रुवारी २०१७ रोजी १८ उद्योग तर आज आरती ड्रग्स लि., कॅमीकल फाईन केमिकल्स लि., रामदेव केमिकल्स, सिक्वांट सायंटीफिक, युनियन पार्क केमिकल्स, आशिष इंटरमीडिएट या ६ उद्योगावर बंदची कारवाई करण्यांत आली असून सारेक्स केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स प्रॉडक्ट आॅफ इंडिया लि. या उद्योगांचे उत्पादन तात्पुरते बंद तर ग्रीन फील्ड केमिकल्सला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
तारापूर एमआयडीसी मधील उद्योगांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे संकेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडलाच्या अधिकाऱ्यांनी तारापूरच्या उद्योजकांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मागील आठवड्यातील बैठकीत देण्यात आले होते. तिला तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा), तारापूर एन्व्हॉयरमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टी.ई.पी.एस.)चे पदाधिकारी, उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशाबाबत मार्गदर्शन करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणा संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून गंभीरपणे दक्षता घ्या, प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याकरीता नवीन आणि वेगवेगळ्या टेक्नोलॉजीचा वापर करास असे आवाहन करण्यात आल्या नंतर शनिवारी रात्री मंडळाच्या वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून सर्वेक्षण केले त्या मधे दोषी आढळलेल्या उद्योगांवर कारवाई केली आहे. (वार्ताहर)