पाणथळ जागेवरील अतिक्रमणावर कारवाई; १९ कोळंबी प्रकल्प तोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:50 AM2019-12-11T00:50:03+5:302019-12-11T00:50:20+5:30
पर्यावरण संवर्धन समितीच्या आंदोलनाला यश
वसई : वसईच्या रानगाव आणि भुईगाव (ता. वसई) येथील पाणथळ जागेवरील पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या अनधिकृत कोळंबी प्रकल्पावर मंगळवारी सकाळी वसई महसूल विभागाने महापालिका आणि वसई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली. येथील १९ कोळंबी प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने तोड कारवाईला सुरूवात केली आहे.
२ डिसेंबरपासून सलग चार दिवस वसई पर्यावरण संवर्धन समिती आणि अनेक सामाजिक संस्था, संघटना आदी पर्यावरणप्रेमी संघटनांनी वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी पालिका, महसूल, महावितरण आणि पोलीस विभागाची एक संयुक्त बैठक घेऊन १० डिसेंबर पासून येथील सरकारी तसेच पाणथळ जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करेल, असे लेखी आश्वासन देत हे आंदोलन स्थगित केले गेले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या लेखी आश्वासनाची पूर्तता करताना वसई महसूल विभागाने येथील रानगाव आणि भुईगाव किनारपट्टी भागात २००० पासून उभ्या असलेल्या एकूण १९ कोलंबी प्रकल्पांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. या कोलंबी प्रकल्पात ९ प्रकल्प हे रानगाव सोसायटीचे तर १० खाजगी व्यक्तीचे असल्याचे वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मंगळवारी सकाळी ६ वा. या कारवाईला सुरुवात झाली. येथील बांध आणि बंधारे तोडून याचे पाणी समुद्राला वळवले. या एकूणच कारवाईत वसई तहसीलदारांसहीत महसूल कर्मचारी अधिकारी, मनपाचे ५० हून अधिकारी आणि ७० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी, अभियंता हे या संयुक्त कारवाईत सहभागी झाले होते.
या कारवाईमुळे जरी आंदोलनकर्ते आणि पर्यावरण प्रेमींचे जरी समाधान झाले असले तरी या प्रकल्पात काम करणारे जवळपास २ हजार ५०० हून अधिक मजूर वर्ग आता रोजगारापासून वंचित झाला आहे. यापुढे ही तोड कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रांतांनी स्पष्ट केले.
या सरकारी पाणथळ जागेवरील कारवाईबाबत रानगाव आणि भुईगाव येथे बºयापैकी मोठे बेकायदेशीर कोलंबी प्रकल्प होते. यात १९ पैकी ३ खाजगी व्यक्तींनी न्यायालयाचे स्थगिती आदेश घेतले. आजच्या पालिका, महसूल आणि पोलीस, महावितरण यांच्या संयुक्त कारवाईत १५ ते १६ प्रकल्पांवर १२ जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करून बांधबंधारे उद्ध्वस्त करत ते पाणी समुद्राकडे वळवले आहे. यापुढेही अशी कारवाई सुरू राहील.
- किरण सुरवसे, वसई तहसीलदार