वर्गणीची खंडणी करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर कारवाई!
By admin | Published: August 7, 2016 03:33 AM2016-08-07T03:33:06+5:302016-08-07T03:33:06+5:30
राज्य सरकार व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. त्याची पायमल्ली करणाऱ्या मंडळ व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणारच
- शशी करपे, वसई
राज्य सरकार व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे प्रत्येक मंडळाचे कर्तव्य आहे. त्याची पायमल्ली करणाऱ्या मंडळ व पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणारच, असा इशारा वसईचे पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी वसईतील गणेश मंडळांना दिले आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि पोलीस कारवाईची कटुता टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पोलिसांनी गणेशोत्सवानिमित्ताने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पहिली बैठक नालासोपारा येथे पार पडली. त्यात त्यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन झाले पाहिजे असा आग्रह धरला. राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावयाचे असल्याने गणेश मंडळांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला सहकार्य करणचे आवाहन केले. अन्यथा मंडळ आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मदाय आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. मंडप टाकण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी सार्वजनिक मंडळांना दिली जाणार नाही, अशी तंबीही मंडळांना पोलिसांनी दिली आहे. रात्री दहानंतर स्पीकर वापरण्यास बंदी असून तिचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शांतता व निवासी झोनमध्ये आवाजाची मर्यादा ५५, वाणिज्य झोनमध्ये ६५ डेसिबल आहे. ती न पाळणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. यावेळी एक लाख रुपे दंडासह सामान जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
मंडळांची कागदपत्रे योग्य असतील त्यांनाच परवानगी दिली जाईल. यावेळी मंडळाचे रजिस्टे्रशन तपासले जाणार आहे. दमदाटी, मारहाण किंंवा शिवीगाळ करून जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची तक्रार आल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिला.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने तयारी सुरु केली असून दोन कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. पालिकेने प्रत्येक विभागात कृत्रिम तलाव तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी शंभर फूट बाय शंभर फूट लांब, रुंद आणि आठ फूट खोलीचे तलाव खोदून त्यात प्लॅस्टिकचा कागद टाकून पाणी साठवले जाणार आहे. त्यात चार फूटापर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. चार फूटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात केले जाणार आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे प्रमुख त्यात-त्या प्रभागाचे सभापती असतील. या समितीत पोलिसांनाही घेण्यात आले आहे. त्यांच्या सहकार्याने कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची मोहिम यशस्वी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.