बेकायदा कोळंबी प्रकल्पांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:06 AM2021-02-12T01:06:55+5:302021-02-12T01:07:01+5:30
१८ प्रकल्प उद्ध्वस्त : महसूल व पालिका प्रशासनाला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसईच्या भुईगाव खारटण भागातील पाणथळ जमिनीवर वसई महसूल विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे उभे असलेल्या कोळंबी प्रकल्पावर बुधवारी कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारीदेखील सुरूच असून कोकण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार येथील १८ कोळंबी प्रकल्प संपूर्ण उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी लोकमतला दिली.
भुईगाव पश्चिम पट्ट्यातील सर्व्हे नंबर २२० या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच जमिनी आहेत. मात्र येथील ५०० हेक्टरहून अधिक जमिनी भूमाफियांच्या ताब्यात आहेत आणि यातील काही सर्व्हे क्रमांक असलेल्या पाणथळ जागेवर धनदांडग्यांनी कोळंबी प्रकल्प टाकले होते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आधीच तक्रार दाखल झालेल्या व मुंबई हायकोर्टाने आदेश करीत कोकण आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिल्यावर दोन दिवसांत झालेल्या या कारवाईत १८ कोळंबी प्रकल्प जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यासाठी मागील दोन दिवस पोलीस ताफा, ३० बुलडोझर, ट्रॅक्टर, अग्निशामक दल आदी फाटा भुईगावात कारवाई ठिकाणी सज्ज होता.
राज्य शासनाने सदर कोळंबी प्रकल्प तोडण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्याचा अहवाल सादर होताच कोकण आयुक्त यांच्या आदेशानुसार या ठिकाणी तोडक कारवाईचे आदेश यापूर्वीच वसई महसूल व महापालिका प्रशासनास दिले. त्यानुसार बुधवार व गुरुवारी दिवसभर ही कारवाई करण्यात आली. वसई महसूल विभागाचे प्रांत स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्ज्वला भगत आणि वसई विरार महापालिका प्रशासन यांच्या नगररचना विभाग तसेच पोलीस विभाग यांनी मिळून कारवाई केली.
पर्यावरण संवर्धन समितीचे समीर वर्तक, फ्रान्सिस डिसोझा, मॅकेन्झी डाबरे व पर्यावरण संवर्धन समिती कार्यकर्ते यांनी ही कारवाई शासनाच्या वतीने होण्यासाठी आतापर्यंत भुईगाव व पश्चिम पट्टीतील गावकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता या दोन दिवसांत संपूर्ण पाणथळ जमीन सरकारने मोकळी केल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत शासनाचे आभारही मानले आहेत.
आज मी थोडा मोकळा श्वास घेईन
गाव व खेड्यात झालेले अतिक्रमण हे शहरावर प्रभाव टाकत असते व असे प्रकार हे पर्यावरणाचे नुकसान करत असतात. त्यात पर्यावरणाचा विषय हा आज जागतिक पातळीवर गंभीर झाला असताना वसईतील ही तोडक कारवाई शासन व न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. त्याबाबत अभिनंदन. मी खूप आनंदी आहे, नक्कीच पर्यावरण संवर्धन समिती वसई उत्तम प्रकारे आपले कार्य व जबाबदारी सांभाळत आहे.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो,
ज्येष्ठ साहित्यिक, संस्थापक पर्यावरण संवर्धन समिती