अवैध ट्रॅव्हल्सवर कारवाई केवळ नोटीसांपुरतीच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:10 PM2019-06-04T23:10:34+5:302019-06-04T23:10:40+5:30
सुट्टीमध्ये नागरिकांची लूट होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली होती मात्र, कारवाई थांबवल्यामुळे नागरिकांना पुन्हा या समस्येचा सामना करावा लागत आहे.
विरार : नागरिकांची लूट होऊ नये म्हणून मोटर वाहन विभागातर्फे वाढत्या अनधिकृत ट्रॅव्हल्सवर कारवाई सुरु करण्यात आली होती. परंतु फक्त नोटीस पाठवून पुढील कारवाई थांबवल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाचे दर पुन्हा वाढल्या आहेत व नागरिकांची लूट सुरु च आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांची बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी वाढत असते. तर यासाठी खासगी वाहन चालकांतर्फे अनधिकृत ट्रॅव्हल्स कंपन्या सुरु करण्यात आल्या होत्या. तिकिटांचे दर दुप्पट वाढल्याने नागरिकांची लूट केली जात होती. तर याला चाप लावण्याकरिता मोटर वाहन विभागा तर्फे अशा अनिधकृत ट्रॅव्हल्स कंपन्यां विरुद्ध कारवाई करण्यात आली होती.
मोटर वाहन विभागातर्फे या ट्रॅव्हल्स कंपन्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. त्याला आता अनेक दिवस उलटून गेले तरी देखील पुढील कारवाई झालेली नाही. ‘कारवाई सुरू केलेली आहे नोटीस पाठवण्यात आली आहे परंतु निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने पुढील कारवाई करता आली नाही. आम्ही ट्रॅव्हल्स कंपन्यांना न्याय मागण्यासाठी वेळ दिला आहे.’ मोटर वाहन विभाग अधिकारी, अनिरुद्ध पाटील यांचे असे म्हणणे आहे. नागरिक परतीसाठी गर्दी करत आल्याने या कंपन्यांचा फायदा होत आहे. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फेतिकिटांचे दर कमी करण्यात आले होते मात्र, कारवाई थांबताच दर पुन्हा वाढविण्यात आले आहेत.
सुट्टीमध्ये नागरिकांची लूट होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली होती मात्र, कारवाई थांबवल्यामुळे नागरिकांना पुन्हा या समस्येचा सामना करावा लागत आहे. मोटर वाहन विभाग अधिकारी निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याचे कारण देऊन कारवाई पुढे ढकलत आहेत. तसेच कारवाई करण्यात हलगर्जी होत असल्याने अनधिकृत ट्रॅव्हल्सना पुन्हा मोकळे रान मिळाले आहे.