‘ब्रेनड्रेन’ थांबविण्याकरिता कृती आराखडा
By admin | Published: October 15, 2015 01:25 AM2015-10-15T01:25:00+5:302015-10-15T01:25:00+5:30
कोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने तरुणांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते.
जयंत धुळप, अलिबाग
कोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या निमित्ताने तरुणांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. ग्रामीण भागातील तरुणांनी जर तेथेच राहून तेथील महाविद्यालयांतून विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याच ग्रामीण भागात नोकरी वा उद्योग केला तर हे ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारा ‘ब्रेनड्रेन’ थांबविणे शक्य होवू शकते आणि या प्रक्रियेकरिता मुंबई विद्यापीठाचा नवा कृती आराखडा निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी त्यांनी आवर्जून ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. त्यांनी कार्यालयातील स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना मुंबई विद्यापीठाच्या नव्या योजनांची माहिती दिली.
ते म्हणाले, महिलांच्या शैक्षणिक व विशेषत: महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ग्रामीण भागात अद्याप अपेक्षित तितक्या सुविधा नाहीत. अलिबाग पेझारी येथे महिलांकरिता महाविद्यालय आहे, ही आनंदाची बाब आहे. खाजगी संस्थांच्या माध्यमातून महिलांकरिता महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, जेणेकरून महिलांना शिक्षणाच्या अधिक संधी आणि त्याही आपल्या परिसरातच उपलब्ध होऊ शकतील.