मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांनी उचलली पावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:36 PM2021-04-30T23:36:35+5:302021-04-30T23:36:47+5:30
नालासोपारा : राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी नालासोपारा परिसरात संचारबंदीतदेखील काही बिनकामाची माणसे विनामास्क, मोकाट फिरताना दिसतात. अनेकदा ...
नालासोपारा : राज्यात कडक निर्बंध लावले असले तरी नालासोपारा परिसरात संचारबंदीतदेखील काही बिनकामाची माणसे विनामास्क, मोकाट फिरताना दिसतात. अनेकदा आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर वसईतील सातही पोलीस ठाण्यांनी पावले उचलून गुरुवारपासून कारवाईला सुरुवात केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कारवाईसाठी पथके नेमली आहेत. तर कारवाई करणाऱ्यांची कोरोना चाचणीही केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामानिमित्तच बाहेर पडण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. मात्र लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी एक शॉर्ट फिल्म बनवूनही लोकांना घरी राहण्यासाठी विनंती केली होती. मात्र त्याकडेही लोक कानाडोळा करीत असल्याने शेवटी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी कडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती.
वसई तालुक्यातील ग्रामीण भागातही कोराेना रुग्ण वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सिस्टर हेदेखील कोरोनाचे शिकार होत आहेत. शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र याचे नालासोपारा परिसरात पालन होताना दिसत नव्हते.
वसई, विरार, नालासोपारा येथे अनेक लोक बिनधास्त विनाकारण फिरताना दिसतात. अशा विनाकारण फिरणाऱ्या व नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारपासून वसई, माणिकपूर, नालासोपारा, तुळींज, वालीव, विरार, अर्नाळा या सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळी पथके तयार करून कारवाई केली जात आहे.
गुरुवारी वसई, माणिकपूर, वालीव आणि तुळींज पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या १८९ आणि विनामास्क फिरणाऱ्या १०९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणीही करून घेतली जात आहे. तुळींज आणि वालीव येथील ५७ नागरिकांची कोरोना चाचणी केली असून, यात दोन जण पॉझिटिव्ह सापडले. शुक्रवारी माणिकपूर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या १६ नागरिकांना ताब्यात घेऊन दिवाणमान तलाव येथील आरोग्य केंद्रात त्यांची कोरोना चाचणी केली असता ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.