विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू; प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 12:00 AM2021-02-21T00:00:59+5:302021-02-21T00:01:12+5:30
प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल : सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी अचानक भेट देण्याचे यंत्रणेला आदेश
पालघर/बोर्डी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुषंगाने शनिवार, २० फेब्रुवारीपासून जिल्ह्यात विविध भागांत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली असून विनामास्क नागरिकांना २०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी अचानक भेटी देण्याचे आदेश प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.
पालघर जिल्ह्यात कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढलेली दिसून येऊ लागली असून अनेक लोक विनामास्क फिरत आहेत. यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या अनुषंगाने आता मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/महाविद्यालये, बँक्वेट हाॅल, रेस्टाॅरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शाॅपिंग माॅल्स, धार्मिक स्थळे, उद्याने, बाजाराची ठिकाणे येथे वेळोवेळी अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात यावी.
तपासणी करण्यात येणाऱ्या ठिकाणी कोविड नियमांचा भंग केला असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या लोकांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाने यंत्रणेेला दिले आहेत. याकरिता तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी यांचा समन्वय ठेवून एकत्रितरीत्या कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी याबाबत कडक धोरण अवलंबिण्याचे आदेश काढल्यानंतर जोरात कारवाई सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. त्यानुसार कोविड नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.