पालेभाज्यांच्या मळ्यांवर केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:26 PM2020-02-08T23:26:02+5:302020-02-08T23:26:06+5:30
भार्इंदर पोलिसांचा पुढाकार । पिकवण्यासाठी करत होते सांडपाण्याचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सांडपाण्यावर पालेभाज्या पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालवला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. भार्इंदर पोलिसांनी पश्चिमेतील खाजगी जागेवरील सांडपाण्यावरच्या पालेभाज्यांच्या मळ्यांवर शुक्रवारपासून कारवाई सुरू केली आहे.
रेल्वेरुळांजवळ तसेच भार्इंदर पूर्वेच्या नवघर येथील सरकारी जागेत व भार्इंदर पश्चिमेस माहेश्वरी भवनकडून मीरा रोडकडे जाणाऱ्या मार्गावर खाडीजवळ तसेच राधास्वामी सत्संगमागील खाजगी जागेत मळे तयार करून पालेभाज्या पिकवल्या जातात. सांडपाण्यावर उघडपणे पालेभाज्या पिकवल्या जातात. या भाज्यांची विक्री सहज केली जात असून अशा भाज्या खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मात्र धोका वाढत आहे. परंतु, या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी, अन्न व औषध प्रशासन आदी संबंधितांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयाने आपल्या अखत्यारित ही बाब येत नसल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी मात्र या गंभीरप्रकरणी कारवाईसाठी पुढाकार घेतला.
अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी या प्रकरणाची जातीने माहिती घेतली. सांडपाण्यावर पिकवल्या जाणाºया पालेभाज्यांच्या मळ्यांचे ठिकाण मागून घेतले. रेल्वेच्या हद्दीतील सांडपाण्यावरील मळे सोडून पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील अशा भाज्यांच्या मळ्यांवर कारवाईसाठी पुढाकार घेतला. पाटील यांच्या आदेशानंतर भार्इंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी कारवाईची जबाबदारी मुंडे, उथळे, सानप, ठाकूर यांच्या पथकावर सोपवली.
पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील खाजगी जागेत असलेल्या या सांडपाण्याच्या भाजीमळ्यांवर कारवाईसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ व जेसीबीची मागणी केली. तीन दिवस पालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर शुक्रवारी पालिकेने काही कर्मचारी दिले. पोलीस पथकाने त्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी भाज्या नष्ट करण्यासाठी काठी, खोरे आदींचा वापर केला. तेथून सांडपाणी खेचण्यासाठी लावलेला एक पंप व पाइप जप्त केले. जवळच्या तबेल्यातील गुरांना या मळ्यांमध्ये सोडण्यात आले. परंतु, सांडपाण्यावरील हे भाज्यांचे मळे मोठ्या प्रमाणात असल्याने पोलिसांनी पालिकेकडे जेसीबीची मागणी केली.
रेल्वेच्या हद्दीतील मळ्यांवर कारवाई केव्हा?
शनिवारी जेसीबी मिळाल्यानंतर त्या जेसीबीच्या मदतीने भाज्या व मळे नष्ट केले. अजूनही काही प्रमाणात मळे शिल्लक असून तेही नष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सांडपाण्यावर पिकवणाºया पालेभाज्यांच्या मळ्यांवर कारवाई सुरू केली असली, तरी रेल्वेच्या हद्दीतील मळे व नवघर येथील मळ्यांवर अजून कारवाई झालेली नाही.