खैराच्या चोरट्या वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:14 PM2019-12-20T23:14:29+5:302019-12-20T23:14:37+5:30
रात्रीच्या सुमारास होते चोरी : आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार, मुद्देमाल जप्त
डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या जंगलातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लाकूड चोरीच्या प्रकारावर आळा बसवण्यासाठी रात्रपाळीत पाळत ठेवत असताना रात्रीच्या सुमारास खैराच्या लाकडांची वाहतूक करणाºया टेम्पोवर कारवाई करून १ लाख १० हजार २५० रुपयांची लाकडे आणि वाहनाची रक्कम २ लाख रुपये असा ३ लाख १० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक आणि आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र . ८ पासून ३०० मीटर पूर्वेला मौजे मेंढवण खिंड येथील कक्ष क्र. १९१ मधील वन विकास महामंडळाकडून राखीव वनात गस्तीवर असताना वाहन जंगलात येण्याचा संशय आल्याने एफडीसीएमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी जंगलात गेले. मेंढवण येथे एक लाल रंगाची गाडी दिसली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक व अन्य साथीदार पसार झाले. गस्तीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी जंगलात फिरून पाहणी केली असता १० खैरांची झाडे तोडून त्यांची वाहतूक करताना ती जप्त करण्यात आली आहेत.
भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एस.पी.कोल्हे (वनपरिक्षेत्र अधिकारी, सोमटा), एन.के. केणी (आरएफओ, जव्हार), एस.ओ. पाटील (वनपाल, वेहेलपाडा), डी.जे. गायकवाड (वनपाल-सोमटा), ई.एस. पिसे (वनपाल), एम.एम. एकशिंगे (वनरक्षक, सोमटा), वाय.एम. धनगर (वनरक्षक), एस.ए. रणमले (वनरक्षक), सी.बी. पाटील (वनरक्षक), एस.आर. पाटील (वनरक्षक), बी.एस. नवघरे (वनरक्षक), सपकाळे, सोनवणे, पाटील आदींच्या पथकाने केली.