भत्ता घेऊनही गावी न राहणाऱ्यांवर कारवाई -चौधरी
By admin | Published: February 18, 2017 06:26 AM2017-02-18T06:26:34+5:302017-02-18T06:26:34+5:30
नियुक्तीच्या गावी न राहता अन्यत्र राहून कागदोपत्री निवास दाखवून भत्ता लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्धार
रविंद्र साळवे / मोखाडा
नियुक्तीच्या गावी न राहता अन्यत्र राहून कागदोपत्री निवास दाखवून भत्ता लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
कामाच्या ठिकाणी न रहाणाऱ्या २०० ग्रामसेवकांचा घरभाडे भत्ता बंद करून त्यांची संभाव्य बढती कायमस्वरुपी ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रद्द केली होती. अशी कठोर कारवाई पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणार कधी?
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्र मगड या तालुक्यातील ग्रामसेवक, सा.बांधकामचे अधिकारी, शिक्षक असे सर्वच प्रशासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी वास्तव्य करीत नाहीत जव्हार मोखाड्यातले काही मोजके कर्मचारी वगळता बाकीचे नाशिक वा अन्य शहरात राहून आलिशान गाड्यांनी ये-जा करतात येताना उशीरा येणे व जाताना लवकर जाणे ही बाब नित्याचीच झाली आहे व त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे.
कामाच्या ठिकाणी रहात असल्याची बोगस माहिती देऊन दुर्गम भागात काम करण्यासाठी मिळणारा विशेष भत्ता लाटणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून वठणीवर आणावे अशी मागणी येथील जनतेकडून होते आहे.
कर्मचारी व ग्रामसेवक यांनी नियुक्तीच्या ठिकाणी रहायला हवे, व्यवस्था व्हायला हवी. तसेच जे कर्मचारी, ग्रामसेवक यात व आपल्या कामात कसूर करत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.
- निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर जिल्हा