नाव-नंबर नसलेल्या बोटींवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:22 AM2020-10-05T00:22:44+5:302020-10-05T00:22:48+5:30
घातपातासाठी होऊ शकतो वापर; पोलीस अधीक्षक पाठवणार पत्र
- हितेन नाईक
पालघर : खानिवडे आणि खार्डी किनाऱ्यावर बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन करणाºया २३० बोटींवर पालघर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली होती. यातील एकाही बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने या बोटींचा देशविघातक कार्यासाठी वापर होण्याची शक्यता पाहता महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने अशा नाव-नंबर नसलेल्या बोटींवर मरिन अॅक्टनुसार कारवाई करावी, यासाठी पोलीस अधीक्षक पत्रव्यवहार करणार आहेत.
जिल्ह्यातील वसई तालुक्यातील खानिवडे, नारिंगी, बहाडोली, मुरबे आदी भागात मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन केले जात असून लोखंडी आणि फायबर बोटींचा वापर यासाठी केला जातो. सुमारे दीड ते दोन हजार बोटींचा वापर यासाठी केला जात असून या बोटींची नोंद महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या बांद्रा कार्यालयातून केली जात आहे. मात्र या बोटींपैकी बहुतांशी बोटींची नोंद केलीच जात नसल्याची माहिती समोर येत असून जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, तारापूर, केळवे, दातीवरे, डहाणू, अर्नाळा, वसई आदी भागात बांधण्यात आलेली मेरिटाइम बोर्डाची कार्यालये नावापुरती असून या कार्यालयात नियुक्त अधिकारी उपस्थित राहात नसल्याने या कार्यालयांना नेहमीच कुलूप लावलेले आढळून येत आहे. बोटीवर नाव आणि नंबर नसल्यास कारवाई करण्याचे अधिकार त्या त्या भागातील बंदर अधिकाºयाला असतानाही बोटीवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे.
पाणजू बेटाजवळ दोन वर्षांपूर्वी रेती उत्खनन करण्याच्या नावाखाली गेलेल्या बोटीवर डहाणू कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. त्या वेळी परप्रांतातल्या कामगारांना अटक करण्यात आली होती.
या कारवाईदरम्यान अनेक कामगारांनी समुद्रात उड्या मारून तिवरांच्या जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर आजही रेती उत्खनन करणाºया बोटींवर नाव नंबर टाकले जात नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी टाकलेल्या धाडीदरम्यान दिसून आले होते. आजही या बोटीत कार्यरत कामगार हे परप्रांतातले असल्याने एखादी घातपाताची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न पोलीस अधीक्षकांना पत्रकार परिषदेत विचारला गेला असता यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाºयांना कारवाईबाबत कळविण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नाव, नंबर नसलेल्या बोटीवर मरिन अॅक्टनुसार महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने कारवाई करावी, यासाठी पत्रव्यवहार करण्यात
येईल.
- दत्तात्रेय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर