शिक्षणाधिकारी सानप यांच्यावर कारवाई होणार?, रवींद्र फाटकांचे आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:31 AM2021-03-30T01:31:00+5:302021-03-30T01:31:49+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरोधात आ. रवींद्र फाटक यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केलेल्या तक्रारीची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेतली जात असल्याने शिक्षणाधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.
- हितेन नाईक
पालघर - कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, निवृत्त शिक्षकांना वेळच्या वेळी पेन्शन न देणे, बेकायदेशीरपणे नियुक्त्या देणे आदी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याविरोधात आ. रवींद्र फाटक यांनी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेत केलेल्या तक्रारीची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेतली जात असल्याने शिक्षणाधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला असून या खात्यातील भ्रष्टाचाराला वेसण घालण्याचे प्रयत्न तत्कालीन उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नीलेश सांबरे यांनी काही प्रमाणात सुरू केले होते. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात बेकायदेशीररीत्या नियुक्त्या, बदलीमध्ये आर्थिक व्यवहार आदी आरोप होत आंदोलने झाली होती, त्यांच्या बदलीनंतर काही कालावधीत त्यांनी पुन्हा आपली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बदली करून घेत भ्रष्टाचाराची साखळी किती घट्ट आहे, हे दाखवून दिले होते. सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप आता एका वेगळ्या प्रकरणात अडकल्या असून हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणाधिकारी लता सानप यांनी कामात कसूर केल्याचे आक्षेप आ. फाटक यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात घेतले होते. सानप यांच्या बेजबाबदारपणामुळे पालघर जिल्ह्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबतचा मुद्दा फाटक यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात ४ मार्च रोजी उपस्थित केला होता. शिक्षण विभागाने तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव, प्रधान सचिव यांना आ. फाटक यांच्या पत्राचा संदर्भ देऊन या सूचनेवर तत्काळ कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. विधानमंडळ सचिवालयाच्या कक्ष अधिकारी यांनीही सभागृहात सूचना उपस्थित केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत संबंधित मंत्र्यांनी त्याविषयीचे उत्तर फाटक यांना देणे अपेक्षित असल्याचे कळविले
आहे.
पालघरच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांनी कामात कसूर केल्याप्रकरणी आमदार रवींद्र फाटक यांनी विधानपरिषदेच्या अधिवेशनात त्यावर आक्षेप घेतले होते. तसेच आमदार फाटक यांनी उपस्थित केलेल्या सूचनांचे पालघरच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.