अखर्चिक 57 कोटींचा निधी विकासकामांवर खर्च करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:18 AM2021-01-03T01:18:50+5:302021-01-03T01:18:57+5:30
जि.प. सर्वसाधारण सभा : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्हा परिषदेचा अखर्चिक राहिलेला ५७ कोटींचा निधी कुठल्याही परिस्थितीत परत न जाता त्याचा वापर मार्चअखेर जिल्ह्यातील विकासात्मक बाबींसाठी खर्च केला जाईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी जि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. यापुढे विभागप्रमुख किंवा अधिकारीवर्ग बैठकीत हजर राहणार नाही, अशांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. १५ व्या वित्त आयोगाच्या आलेल्या सुमारे सात कोटी ५० लाख निधीवर सत्ताधारी पक्षाने स्वतःचे वर्चस्व गाजवत अधिकाधिक निधी आपल्याकडे कसा राहील, अशा आखलेल्या डावाला विरोधी पक्षाने कडवा विरोध दर्शविला. त्यामुळे या निधीची समान विभागणी न करता पाच सभापतींनी सुमारे २० लाख रुपये, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना प्रत्येकी सात लाखांची कामे सुचवण्याच्या प्रयत्नाला कडाडून विरोध झाला. निधीचे समान वाटप करावे, अन्यथा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकू, असा पवित्रा विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले यांनी घेतला. यावर जोरदार खडाजंगी झाल्यावर यामध्ये समन्वय साधत तीन लाखांऐवजी पाच लाखांचा निधी विरोधकांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शासकीय निधीचा अपहार करण्याच्या प्रकरणात अग्रेसर असणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील ११ अंगणवाड्यांची बांधकामे न करता परस्पर पैसे काढण्याचा प्रकार सभेत गाजला. या प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक आणि ठेकेदारांवर कडक कारवाईसह सरपंचाच्या अपात्रतेसंबंधीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सदस्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली. जि.पच्या सुरुवातीपासून अनधिकृत शाळांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला जात असला, तरी त्यावर आजपर्यंत कारवाई होत नसल्याने या मुद्द्यावरही चर्चा होत कारवाईची मागणी करण्यात आली.
वाढवण बंदराला सर्वांचाच विरोध
वाढवण बंदराविरोधात ठराव घेण्याची मागणी शिवसेना गटनेते जयेंद्र दुबळा यांनी केल्यानंतर सर्वांनी बंदराला आपला विरोध दर्शविला. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांतील रुग्णांना वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना २५ रुग्णवाहिका भेट दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.