बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आदिवासी परिषदेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 10:59 PM2019-06-09T22:59:25+5:302019-06-09T22:59:32+5:30
पोलीस डॉक्टर दांम्पत्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप : रॅकेट असल्याची भीती
मनोर : पालघर मधील एका नर्सिंग होममध्ये डॉक्टर दांपत्याने बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याची घटना उघडकीस त्या पार्श्वभूमीवर त्या डॉक्टर दांपत्यावर व त्याला पाठीशी घालणाºया सरकारी डॉक्टर अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा मागणीसाठी आदिवासी एकता परिषद व एकविरा आदिवासी संस्थेतर्फे पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
वैशाली नर्सिंग होम पालघर येथे ४ एप्रिल २०१९ रोजी एका आठ महिन्यांची गरोदर असलेल्या तरु णीचा बेकायदेशीर गर्भपात करून बाळाचा मृतदेह एका पिशवीत घालून तिच्या वडिलांकडे विल्हेवाट लावण्यासाठी दिल्याचा आरोप करून त्या तरुणीवर अत्याचार झाल्याची शक्यता आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी व्यक्त केली आहे. अशा तरुण अविवाहितांचा बेकायदेशीर गर्भपात करतांना त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे सांगून ८ महिन्याच्या बाळाचा खून केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी करून हे नर्सिंग होम चालवणाºया डॉक्टर बुद्धे दाम्पत्याला पोलीस व प्रशासनाने पाठीशी घातल्याचा आरोप केले आहेत. सुमारे २० ते २५ वर्षापासून पालघरमध्ये हे वादग्रस्त नर्सिंग होम कार्यरत असून त्याला सन २०११ मध्ये रीतसर परवानगी मिळाल्याचे या आंदोलनकर्त्यांंनी निदर्शनास आणून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे गर्भपात करणे, स्त्री भ्रूण हत्या करणे, जन्मलेल्या बाळाची व लहान मुलांची तस्करी करणे असे रॅकेट सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून या गैरकृत्यामुळे संपूर्ण आरोग्ययंत्रणेला काळीमा फासला जात असल्याचे म्हटले आहे.