अनुसुचीत जमातीसाठीच्या राखीव पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन, अवघ्या एका दिवसात दिली मंजुरी;तक्रारी होऊनही कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:43 PM2017-10-15T12:43:56+5:302017-10-15T12:44:20+5:30
अनुसुचीत जाती जमाती ( एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिक्षकाच्या पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन ठाणे जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
मीरारोड - अनुसुचीत जाती जमाती ( एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिक्षकाच्या पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन ठाणे जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. विशेष म्हणजे अवघ्या एका दिवसात तत्कालिन शिक्षण अधिका-याने ही मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक/शिक्षकेतर संघाने या बाबत सातत्याने तक्रारी करुन देखील शिक्षण विभागाच्या अधिका-यांकडून मात्र केवळ कागदीघोडे नाचवले जात असल्याचे समोर आले आहेत. तर अन्य शिक्षक समायोजनांच्या कार्यपध्दती मध्ये देखील अनियमीतता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
भार्इंदर पुर्वेला मां भारती हिंदी माध्यमाची खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षक सुनिल बी. तिवारी हे अतिरीक्त ठरले. तिवारी यांनी २३ डिसेंबर २०१४ रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागा कडे अर्ज करुन मीरा भार्इंदर महापालिकेच्या शाळां मध्ये हिंदी माध्यमातील रीक्त असलेल्या शिक्षकांच्या पदावर समायोजन करुन घेण्याची विनंती केली.
२३ डिसेंबर २०१४ रोजी तिवारी यांनी समातोजनेचा अर्ज दिला नाही तोच दुसरया दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर २०१४ रोजी तत्कालिन प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी यांनी तिवारी यांचा अर्ज मंजुर करत महापालिकेच्या हिंदी माध्यमातील शिक्षकांच्या रिक्त पदावर समायोजन करुन घेतले.
वास्तविक महापालिकेच्या हिंदी माध्यमातील शिक्षकांची फक्त सहाच पदं रिक्त असुन सदर सर्व रिक्त पदं ही अनुसुचीत जाती जमातीच्या प्रवर्गांसाठी राखीव आहेत. तर सुनिल तिवारी हे खुल्या प्रवर्गातील असताना त्यांना अनुसुचीत जाती जमातीसाठीच्या राखीव रिक्त पदावर समायोजन करण्यात आले आहे.
सदर समायोजनाची कार्यवाही करताना शिक्षकांची रिक्त असलेली सर्व ६ पदं अनुसुचीत जाती जमाती प्रवर्गाची असल्याचे सोयीस्कर दुर्लक्षित करण्यात आले असल्याचे दिसते. त्यातही तिवारी यांना समायोजन करण्यासाठी एकुणच अधिकारयांनी दाखवलेली कार्यतत्परता कमालीची संशयास्पद आहे.
महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक / शिक्षकेतर संघाच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष एम.एम.प्रजापती यांनी आॅगस्ट २०१६ पासुन शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण संचालक पुणे, ििशक्षण संचालक प्रथमिक पुणे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या सह राज्याच्या अनुसुचीत जाती जमाती आयोगा कडे देखील तक्रारी केल्या आहेत.
आयोगाने देखील या प्रकरणी शिक्षणाधिकारी व पालिकेच्या प्रशासन अधिकारी यांच्या कडुन अहवाल मागवुन घेतला. तर शिक्षण उपसंचालकांनी देखील कार्यवाही करुन अहवाल सादर करण्यास सांगीतले . परंतु या प्रकरणी सुस्पष्ट अहवाल न देता मुळ मुद्दा लपवुन थातुरमातुर अहवाल देण्यात आलाय. तसा आरोप प्रजापती यांनी करत या समायोजन घोटाळ्यातील दोषी अधिकारयांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षक समायोजनात भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय.
तर अनुसुचीत जाती जमाती आयोगाला पाठवलेल्या खुलाशात महापालिकेतील प्रशासन अधिकारी सुरेश देशमुख यांनी मात्र तिवारी यांचे समायोजन कोणत्या राखीव प्रवर्गात केले आहे याचा कुठेच उल्लेख केला नाही. उलट शिक्षणाधिकारी ठाणे यांनी दिलेल्या आदेशा नुसार तिवारी यांचे समायोजन केले असे म्हटले आहे. दुसरी कडे प्रजापती हे एका महिला शिक्षीकेच्या बदलीसाठी आले असता ते नियमात बसत नसल्याने बदली केली म्हणुन सुडभावनेने ते तक्रार करत असल्याच देशमुख यांनी अहवालात म्हटले आहे.
तर तिवारी यांचे बेकायदा समायोजन केल्या प्रकरणी देशमुख आदींचे संगनमत असुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने ते मुळ मुद्याचे गांभीर्य बाजुला ठऊन खोटी दिशाभुल करत आहेत असे प्रजापती म्हणाले.
या आधी देखील भार्इंदर पुर्वेच्याच भारतिय विद्यालयातील दोघा शिक्षीकांना त्या अतिरीक्त नसताना तसेच त्या अतिरीक्त ठरल्याचे व समायोजनाचे आदेश नसताना देखील पालिका शाळां मध्ये समावुन घेण्यात आले असे प्रजापती यांनी सांगीतले.