जैवविविधता नोंदीबाबत प्रशासनाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 01:16 AM2021-01-08T01:16:11+5:302021-01-08T01:16:18+5:30
उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी व खाडी परिसरात आणि पश्चिम घाटाच्या कुशीत जैवविविधता ठासून भरली आहे.
हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील सागरी किनारा, खाडी आणि पश्चिम घाटाच्या रांगांतील परिसंस्था जैवविविधतेने संपन्न असल्याने येथे विविध हंगामात शेकडो देशी-परदेशी पक्षी आणि वन्य प्राण्यांचा वावर आढळतो. ही जैवविविधता भविष्यात टिकून राहावी यासाठी राज्य शासनाने ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक जैवविविधता नोंदविण्यासाठी वह्या वाटप केल्या आहेत. मात्र त्या नोंदीअभावी कोऱ्या असल्याचे वास्तव राज्य जैवविविधता मंडळाच्या पत्राने समोर आल्याने जैवविविधतेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे दिसून आले आहे.
उत्तर कोकणातल्या पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी व खाडी परिसरात आणि पश्चिम घाटाच्या कुशीत जैवविविधता ठासून भरली आहे. वैशिष्ट्यपूर्ण व विपुल प्रमाणात अनेक जातींचे प्राणी, वनस्पती व पक्षी आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोक जैवविविधता समित्यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे सादर केलेल्या नोंदवह्यांमध्ये त्याबाबत पुरेशी नोंद केली नसल्याचे समोर आले आहे. टप्पा २ मधील नोंदी करताना या जैवविविधतेची सविस्तर माहिती नोंदवून या मंडळाच्या कार्यालयात सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात विविध हंगामात देशी-परदेशी शेकडो पक्ष्यांचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. वन विभागानेही त्याची दखल घेतली आहे.
गेल्या आठवड्यात यूरोपियन कलहंस दाखल झाले. तसेच चक्रवाक, लेसर व्हिसलिंग, पेंटेड स्टोर्क, ग्लॉसी आयबीस, ब्लॅक हेडेड आयबीस, फ्लेमिंगो आदी पक्ष्यांच्या थव्यांचे दर्शन चिंचणी, तारापूर, केळवे येथे होत असते. मागील अनेक वर्षांपासून या पक्ष्यांनी या भागाला पसंती दिल्याची माहिती स्थानिक पक्षी निरीक्षकांनी दिली.
डहाणू उपवन संरक्षक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना जैवविविधता नोंदवह्या वाटप केल्या आहेत. त्यापैकी चिंचणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नीलेश जाधव यांनी वही मिळालीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिंचणी गावात विविध पक्ष्यांचा वावर असताना, त्याची नोंदच ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेली नाही. परंतु ४ जानेवारी २०२० रोजी त्यांना वह्या दिल्याची माहिती बोईसर वनपरिक्षेत्राचे अधिकारी एन. एल. मोरे यांनी दिली. त्यामुळे जैवविविधता टिकून ठेवण्याबाबत प्रशासन पातळीवर उदासीनता दिसून येत आहे.
या विषयाच्या अनुषंगाने माहिती घेतो. शासन पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सिद्धराम सालीमठ,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पालघर
जैवविविधता नोंदवही अद्याप प्राप्त झाली नसून ग्रामपंचायतीला निधीही वर्ग झालेला नाही.
- नीलेश जाधव,
ग्रामविकास अधिकारी,
चिंचणी ग्रामपंचायत, ता. डहाणू.