दापचरी येथे अडविले टँकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:48 AM2018-07-18T05:48:10+5:302018-07-18T05:48:19+5:30
मंगळवारी दुपारी खासदार राजू शेट्टी तसेच काळूराम धोदडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधून मुंबईकडे येणारे दुधाचे टँकर अडवून ते माघारी पाठवले.
- सुरेश काटे
तलासरी : मंगळवारी दुपारी खासदार राजू शेट्टी तसेच काळूराम धोदडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधून मुंबईकडे येणारे दुधाचे टँकर अडवून ते माघारी पाठवले. या वेळी तलासरी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. खासदार राजू शेट्टी व त्यांचे कार्यकर्ते दापचरी तपासणी नाका येथे टँकर अडविण्यासाठी तळ ठोकून होते. हे समजताच गुजरातमधून येणारे दुधाचे टँकर गुजरातमध्येच थांबविण्यात आले. दुपारनंतर दुधाचा एकही टँकर मुंबईकडे रवाना झाला नाही. सोमवारपासून स्वत: खा. राजू शेट्टी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा मुंबईला होत असल्याने राजू शेट्टी, आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे यांनी ५० टँकर अडवून गुजरातला पाठवले. गुजरातमार्गे दूध आले तर आक्र मक व्हावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
>दुधाच्या दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसºया दिवशी मंगळवारी बीड येथे परराज्यातून आलेले टँकर अडवून पाली येथे घोषणाबाजी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दुधाचे वाटप केले.
>अमूलसह इतर डेअरींचे एक कोटीचे नुकसान
पालघर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलानामुळे विरार पूर्व भागातील अमूल दूध संकलन केंद्रात राज्यातील इतर ठिकाणाहून व गुजरातमधून दुधाच्या गाड्या न आल्याने व पुरवठाही न झाल्याने आंदोलनाच्या दुसºया दिवशी १ कोटीचे नुकसान झाल्याचे डेअरीच्या व्यवस्थापनाने ‘लोकमत’ला सांगितले.