१६ दिवसांनी वयोवृद्ध पेट्रोल पंपांच्या मालकाच्या हत्येचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2024 05:31 PM2024-09-13T17:31:29+5:302024-09-13T17:32:11+5:30
पोलिसांनी रोख रक्कम, हिऱ्याची अंगठी व महागडे घड्याळ असा १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- अपहरण केलेल्या ७५ वर्षीय वयोवृद्ध पेट्रोल पंप चालकाच्या हत्येचा उलगडा करण्यात १६ दिवसांनी युनिट दोन आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. पोलिसांनी रोख रक्कम, हिऱ्याची अंगठी व महागडे घड्याळ असा १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उल्हासनगरच्या आर्केट बिल्डिंगमध्ये राहणारे पेट्रोल पंपमालक रामचंद्र काकराणी (७५) यांची त्यांच्या कारमध्ये रूमालाने गळा आवळून हत्या केलेला मृतदेह २५ ऑगस्टला दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा येथे सापडला होता. जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने अपहरण करून हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार युनिट दोन आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार केली. रामचंद्र काकराणी यांचा कार चालक मुकेश खूबचंदाणी (५८) याचेसह साथीदार रामलाल यादव (२२) व अनिल राजकुमार उर्फ नेपाल उर्फ सहानी उर्फ थापा (३२) यांनी ही हत्या केली आहे. हे तिघे मागील सात महिन्यापासून हत्येचे प्लॅनिंग करत होते. १० लाखांची अंगठी व ५ लाखांचे घड्याळ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर गोरखपूर येथे सापळा रचून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी मुकेश आणि अनिल उर्फ थापा यांना अटक केली आहे. तर फरार आरोपी रामलाल यादवचा शोध घेत आहेत. आरोपी चालक मुकेश खूबचंदाणी याच्यावर मुंबईत याआधी ६ गुन्हे दाखल आहेत.
तिन्ही आरोपी वसई फाट्यावरून विरार फाट्यापर्यंत रिक्षाने, विरार फाट्यावरून तलासरीपर्यंत मेटा ट्रॅव्हल्सने पळाले. तेथून पायी गुजरात बार्डर क्रॉस केली व नंतर बसने अहमदाबाद - दाऊद - इंदोर - झासी - कानपूर - नेपाळ बॉर्डर पर्यंत पळाले होते. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, मध्यवर्ती शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, नितीन बेंद्रे यांच्यासह पथकाने केली आहे.